पुणे : पुणे महापालिकेच्या आराेग्य विभागात वर्ग एक पासून म्हणजे वरिष्ठ आराेग्य अधिकारी, विशेषज्ञ डाॅक्टरांपासून वर्ग चारपर्यंतच्या म्हणजेच शिपाई यांच्यापर्यंत कायमस्वरूपी मंजूर असलेल्या मणुष्यबळापैकी जवळपास निम्मेच पदे रिक्त आहेत. त्यामुळे आराेग्य खात्यात प्रशासनापासून दवाखाने, रुग्णालयापर्यंत रुग्णसेवेवर परिणाम हाेत आहे. तर बहुतांश ठिकाणी कंत्राटी स्वरूपातील डाॅक्टर, कर्मचारी व इतर मनुष्यबळ यांच्यावर कामाचा भार येत आहे.
पुणे शहराच्या आराेग्य खात्यात वर्ग एक ते चार पर्यंत २०६७ इतके मनुष्यबळ मंजूर आहे. त्यापैकी केवळ १ हजार ८१ पदे (५२ टक्के) भरलेले आहेत. तर ४८ टक्के पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग एकचे (वरिष्ठ आराेग्य अधिकारी, तज्ज्ञ डाॅक्टर जसे स्त्रीराेगतज्ज्ञ, बालराेगतज्ज्ञ, कान- नाक- घसा तज्ज्ञ आदी) यांचे १४१ पदे मंजूर असून त्यापैकी केवळ ४० पदे (२८ टक्के) भरलेले आहेत. तर, १०२ पदे (७१ टक्के) रिक्त आहेत. तज्ज्ञ डाॅक्टर हा आराेग्यसेवेचा कणा आहे. परंतू, हीच पदे माेठया प्रमाणात रिक्त आहेत. रुग्णसेवा कशी करायची, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
वर्ग दाेनमध्ये वैदयकीय अधिकारी, निवासी वैदयकीय अधिकारी येतात. त्यांचे २६२ पदे मंजूर असून १८० पदे (६८ टक्के) भरलेले आहेत. तर उरलेले ३१ टक्के पदे रिक्तच आहेत. तर वर्ग तीन मध्ये परिचारिका, फार्मासिस्ट, एक्स रे टेक्निशियन, अन्न निरीक्षक, आराेग्य निरीक्षक, सांख्यिकी आदी यांचे १०४६ पैकी ५८१ (५३ टक्के) पदे भरलेले आहेत व ४७ टक्के रिक्त आहेत. तर, वर्ग चारचे पदे ज्यामध्ये स्वच्छता करणारे कर्मचारी, शिपाई, लॅब अटेंडंट, सुरक्षा रक्षक यांचे ६१७ पैकी २८० पदे (५४ टक्के) पदे भरलेले आहेत. तर, ३३७ पदे म्हणजेच ४६ टक्के पदे रिक्त आहेत.
पुणे शहरात समाविष्ठ गावांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लाेकसंख्या ५५ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यातच अशा प्रकारे माेठया प्रमाणात सर्व प्रकारचे पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेवर त्याचा परिणाम हाेताे. तर गेल्या काही वर्षांपासून कायमस्वरूपीचे पदे भरण्याऐवजी कंत्राटी पदे भरण्याकडे महापालिकेचा कल आहे.