पुणे : पाटणची घटना ही महाराष्ट्रातली लेटेस्ट लिटमस टेस्ट होती. पुढची विकेट माझीही असू शकेल. मी भयभीत वगैरे होऊन माझे शब्द म्यान करून ठेवेन असं वाटणाऱ्यांना सद्बुद्धी मिळो. मी मेलेली कोंबडी नाही, जिवंत आहे आणि आग काय असते तेही नीट जाणून आहे. ‘लडाई जारी रहेगी’ असा सूचक इशारा प्रज्ञा दया पवार यांनी विरोधकांना दिला. इथल्या लोकशाहीवर माझा नितांत विश्वास आहे आणि ‘लडेंगे तोही बचेंगे’ असा निर्धार तर आमच्या बापाच्या महाबापाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीचाच माझ्यात रुजवला आहे, असेही त्या म्हणाल्या. पाटण येथे आयोजित विभागीय साहित्य संमेलनामध्ये घडलेला प्रकाराचा निषेध करताना त्या म्हणाल्या, ‘‘माझे अध्यक्षीय भाषण श्रोते तन्मयतेने ऐकत होते. भाषणातल्या सर्व मुद्द्यांना सहमती दर्शवत अशा पद्धतीची चर्चा होण्याची नितांत गरज आहे, असं नंतर मला सांगत होते. परखडपणाचं, विश्लेषक शैलीचं कौतुक करत होते. मी जर कुणाला दुखावणारं काही बोलले असते तर असं चित्र दिसलं असतं का? असा सवाल उपस्थित केला.पहिल्या दिवसातला माझा संमेलनातला वावर एकाही व्यक्तीला का खटकला नाही? असं काय शिजलं एका रात्रीत की दुसऱ्या दिवशी मी धोकादायक ठरले? कुठला तरी माथेफिरू शंभर दीडशेचा जमाव दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या खोलीजवळ येऊन ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा काय देतो, त्यानंतर मला आणि डॉ. रावसाहेब कसबे यांना तिथून निघून जाण्यास काय सांगितलं जातं. वर आमच्याच सुरक्षिततेचा आव आणून आम्ही हे करतो आहोत असं आम्हाला भासवलं काय जातं आणि हे सगळं डॉ. आंबेडकर यांच्या विचारस्मृतींना समर्पित केलेल्या मसापच्या विभागीय मराठी साहित्य संमेलनात घडतं! संमेलनातील बाकीची सर्व सत्रं व्यवस्थित पार पडतात. कहर म्हणजे पुढचा परिसंवादाचा विषय असतो - अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि साहित्यिकांची उदासीनता! तुम्ही दलित आहात आणि तुम्ही काही बोलायचंच नाही आता यापुढे, बोललात तर काय होईल, ते आम्ही तुम्हाला दाखवतो, ही मग्रूर झुंडशाही चालून येते आणि ज्यांनी आम्हाला सन्मानाने तिथं निमंत्रित केलं होतं, ते हा सर्व प्रकार थांबवू शकत नाहीत. या घटनेचा मी निषेध करते.
ही तर ‘लिटमस टेस्ट’
By admin | Published: October 12, 2016 2:53 AM