पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर धर्मादाय रुग्णालयांच्या रुग्णसेवेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शहर आणि जिल्ह्यातील एकूण ५८ धर्मादाय रुग्णालयांपैकी २९ रुग्णालयांनी त्यांच्या निधीपेक्षा जास्त खर्च रुग्णांवर केला असून, २१ रुग्णालयांचा कोट्यवधी निधी शिल्लक राहिला आहे. ही रुग्णालये रुग्णांवर उपचारासाठी हात आखडता घेत आहेत. त्यामुळे या २१ रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा पैसाच अधिक प्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धर्मादाय योजनेअंतर्गत ज्या निर्धन रुग्णाचे वार्षिक उत्पन्न रुपये ८५ हजार इतके आहे. त्यांना १० टक्के राखीव खाटा व पूर्ण मोफत उपचार केले जातात. तर दुर्बल घटकांतील लाभार्थी ज्या रुग्णाचे वार्षिक उत्पन्न रुपये १ लाख ६० हजार इतके आहे, त्यांना १० टक्के राखीव खाटा व उपचाराच्या दरात ५० टक्के सवलत देण्यात येते. धर्मादाय आयुक्तालय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते डिसेंबर २०२४ या एका वर्षात पुणे जिल्ह्यातील ८६ हजार ८२६ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. परंतु यामध्ये २१ मोठ्या हाॅस्पिटलचा राखीव निधी मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला आहे. शिवाय २९ रुग्णालयांनी त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या निधीपेक्षा जास्त पैसा खर्च केला आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि निर्धन रुग्णांवर मोफत उपचारांसाठी १० टक्के बेड राखीव ठेवण्याचा नियम आहे; पण सर्रास रुग्णालयांत याची माहिती दिली जात नाही. यामुळे गरीब व गरजू रुग्ण या योजनेपासून वंचित राहतात.
असा आहे धर्मादायचा नियम
धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशांनुसार संबंधित रुग्णालयावर ‘धर्मादाय’ असा ठळक उल्लेख अपेक्षित आहे. गरीब व निर्धन रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव असल्याचा फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. या योजनेची माहिती देणारा स्वतंत्र प्रतिनिधी आणि त्याचा संपर्क क्रमांक प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
जून ते डिसेंबर या सहा महिन्यांत उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण घटले
वर्षभरात रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून जमा होणाऱ्या एकूण बिलांपैकी दोन टक्के रक्कम धर्मादाय योजनेतून उपचारासाठी राखून ठेवावी लागते. गेल्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असून, या काळात ३३ हजार ८०३ निर्धन रुग्ण आणि १५ हजार ७८१ दुर्बल घटकातील रुग्णांनी उपचार घेतले. तर जुलै ते डिसेंबर या काळात उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण घटले असून, या काळात २४ हजार ६९२ निर्धन रुग्ण आणि १२ हजार ५५० दुर्बल घटकातील रुग्णांनी उपचार घेतले.
४ कोटींंवर निधी शिल्लक
जानेवारी ते डिसेंबर २०२४ या काळात पुणे शहर आणि जिल्ह्यातील ५८ धर्मादाय रुग्णालयांपैकी २९ रुग्णालयांनी त्यांच्याकडे असलेला निधी पूर्ण खर्च केला आहे. त्यातील २१ रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार करताना हात आखडता घेतल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे या २१ रुग्णालयांकडे डिसेंबरअखेर एकूण ४ कोटी ३१ लाख ५८ हजार ५२४ इतका निधी शिल्लक होता.
अशी उपचार घेतलेल्या रुग्णांची आकडेवारी
एकूण धर्मादाय रुग्णालये : ५८राखीव निधीपेक्षा जास्त खर्च केलेल्या रुग्णालयांची संख्या : २९
राखीव निधीपेक्षा कमी खर्च केलेल्या रुग्णालयांची संख्या : २१डिसेंबरअखेर शिल्लक राहिलेला निधी : ४,३१,५८,५२४
पहिल्या सहा महिन्यांत उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या : ४९,५८४जुलै ते डिसेंबर दरम्यान उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या : ३७२४२