पुणे : आग लागून जळताना भिंत पडल्याने अधिकच हानी झालेल्या शुक्रवार पेठेतील वाड्याने जुन्या पुण्यातील वाड्यांची धोकादायक स्थिती पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. शहरात २०० पेक्षा अधिक वाडे अधिकृतपणे धोकादायक असून, ५० पेक्षा अधिक वाडे अतिधोकादायक वर्गवारीत गेले आहेत. तरीही तिथे अद्याप भाडेकरू वास्तव्य करीत आहेत. महापालिकाही केवळ नोटिसांचा उपचार करून शांत बसत आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने या वाड्यातील भाडेकरू; तसेच मालकांनाही नोटीस बजावली आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून तेथील भाडेकरू घर सोडायला तयार नाहीत. राज्य सरकारने कायद्यात काही वर्षांपूर्वी दुरुस्ती करून महापालिका धोकादायक वाडे जबरदस्तीने खाली करून घेऊ शकते, असा नियम केला आहे. तेथील भाडेकरूंचा त्यांच्या जागेवरील हक्क अबाधित राहावा म्हणून त्यांना ‘वाडा महापालिकेने खाली करून घेतला, त्यातील तुमच्या जागेचे क्षेत्रफळ अमूक अमूक होते’ असे प्रमाणपत्र देते. त्याचा न्यायालयात पुरावा म्हणून उपयोग करता येतो.कायद्यात अशी सुधारणा झाल्यानंतरही महापालिकेकडून मात्र त्याची फारशा प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. बांधकाम विभागाच्या वतीने दर वर्षी शहरातील धोकादायक वाड्यांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी खास निविदा काढण्यात येते. स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून ही तपासणी होते. त्यांचा अहवाल आल्यानंतर, त्यात नमूद आहे त्याप्रमाणे धोकादायक व अतिधोकादायक असे वर्गीकरण करून महापालिका त्यांना नोटीस बजावते. असे सुमारे २०० धोकादायक वाडे शहरात आहेत. बहुतेक वाड्यांमध्ये भाडेकरू व घरमालक यांच्यात वाद असतात. जागा सोडली तर आपला हक्क जाईल, अशी शंका भाडेकरूंमध्ये असते. तर घर पडले तर चांगलेच, भाडेकरूंचा त्रास आपोआप कमी होईल, अशी घरमालकांची भावना असते. त्यामुळे ‘अतिधोकादायक’ अशी नोटीस डकवून महापालिकेचे अधिकारी शांत बसतात. कायद्यातील तरतुदीचा आधार घेत असे अतिधोकादायक वाडे स्वत: होऊन पाडावेत, अशी मागणी होत आहे. जुन्या पुण्याच्या मध्यभागातच असे वाडे असून, त्यातील काही शंभर वर्षांपेक्षाही जुने आहेत. अग्निशामक बंबांनाही मिळेना मार्गजुन्या पेठांमधील किंवा झोपडपट्ट्यांमधील अरुंद रस्त्यांवरून जाऊन अस्ताव्यस्त पार्किंगमधून दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचणे अग्निशामक दलाला दिवसेंदिवस जिकिरीचे होत चालले आहे. आग लागल्यानंतरचा एक एक मिनीट महत्त्वाचा असताना चिंचोळ्या बोळांमध्ये असलेल्या वाड्यांमध्ये लागलेली आग शमविण्यासाठी विलंब लागत असल्याचे दलाच्या कर्मचाऱ्यांचे निरीक्षण आहे. शुक्रवार पेठेत आज पहाटे लागलेल्या आगीमुळे जुन्या पेठांमधील जुनाट वाडे, अरुंद रस्ते, अत्यंत दाटीवाटीने रस्त्यांवर उभी केलेली वाहने आणि अग्निशामक दलास या सर्व कारणांमुळे आलेल्या मर्यादा हा विषय ऐरणीवर आला आहे. अग्निशामक दलाचे बंब लांब अंतरावर उभे करावे लागत असल्याने पाण्याचे प्रेशर व्यवस्थितपणे येत नाही. त्यामुळे आग विझविताना अडचणी येतात. बंद अवस्थेत असलेल्या वाड्यामध्ये आत काय आहे, याची माहिती नसल्याने धोका पत्करत दुर्घटनेशी सामना करावा लागतो, असे दलातील कर्मचाऱ्यांशी बोलताना जाणवले.शुक्रवार पेठेत आज लागलेल्या आगीच्या वेळी अन्य दोन वाड्यांचा आश्रय घेऊन आग शमवावी लागली. दुर्घटनेच्या ठिकाणी आगीला उपयुक्त वस्तू लाकूड किंवा फिनेल, अॅसीड, तेलाचे डबे असे पदार्थ असतील तर आगीची तीव्रता वाढते.इमारतीच्या प्रकारानुसार आगीची तीव्रता कमी-अधिक असू शकते. आरसीसी बांधकाम असेल तर तुलनेने कमी हानी होते. आग लागल्याची ‘वर्दी’ येताच अग्निशामक दलाचे कर्मचारी ३०ते ४० सेकंदांमध्ये तयार होऊन आगीच्या ठिकाणी रवाना होतात, रात्रीच्या वेळी वाहने रस्त्यांवरच उभी केली जात असल्याने दलाचा बंब जाण्यात अडथळे येतात. मात्र, आग लागल्यानंतर सतत अग्निशामक दलाला फोन करून बोलाविणारे नागरिक विलंब झाल्यास त्याचे खापर अग्निशामक दलावर फोडत असल्याचे चित्र आहे.अग्निशामक दलाचा बंब अंतर्गत रस्त्यांपर्यंत नेऊन उभा करावा लागतो. पाण्याचे पाइप आगग्रस्त ठिकाणापर्यंत न्यावे लागतात. वाड्यांच्या बांधकामामध्ये लाकडाचा भरपूर वापर केला गेला असल्याने आग शमविण्यासाठी पाण्याचा मारा केल्यानंतर भिंती ढासळण्याचा धोका असतो.
धोकादायक वाड्यांवर केवळ नोटिसांचा उपचार
By admin | Published: May 04, 2017 3:11 AM