लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात अवयवदानासाठी इतर आवश्यक पायाभूत सुविधा चांगल्या असूनही केवळ जनजागृतीच्या अभावामुळे अवयवदानाचे प्रमाण हे प्राप्तकर्ता आणि दान करणारा हे प्रमाण दहा हजारास एक इतके अत्यल्प आहे. अवयवदानाबाबत फारशी जनजागृती नसल्याने हे प्रमाण इतके कमी आहे, असे पुण्यातील ‘रिबर्थ’ या अवयवदाबाबत जनजागृती आणि प्रबोधनाचे काम करणा-या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश शेट्टी यांनी सांगितले.
ते म्हणाले, काही दशकांपूर्वी रक्तदानाबाबत ज्या काही चुकीच्या संकल्पना होत्या, त्या जनजागृतीमुळेच पूर्णपणे दूर झाल्या आहेत. तशाच प्रकारे अवयदानाबाबतही करायला हवे. त्यामुळे संस्थेने रुग्णालयात समुपदेशकाचे काम करण्यापेक्षा जनजागृतीवर काम करण्याचे ठरवून संस्थेची स्थापना २०१५ मध्ये केली.
जनजागृतीमुळे ग्रीफ काउंसेलरचे (मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानासाठी नातेवाईकांची संमती मिळवण्यासाठी समुपदेशन करणारी व्यक्ती) काम सोपे होणार आहे. मेंदूमृत रुग्णाच्या आठ अवयवांचे प्रत्यारोपण गरजू रुग्णांत करता येते. भारतात लोकसंख्येचे प्रमाण मोठे असूनही याबाबत अनेक अंधश्रद्धा, मिथके आहेत. पुनर्जन्म संकल्पनेवर विश्वास असलेल्या व्यक्तीने अवयवदान केले तर पुढील जन्मात ते अवयव आपल्याला मिळणार नाहीत, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे प्रबोधन व जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.
संस्थेचे सदस्य प्रमोद महाजन यांनी अवयवदान प्रबोधन व जनजागृतीसाठी संपूर्ण भारतभर ३० हजार किमीपेक्षा जास्त प्रवास एकट्याने दुचाकीवर केला आहे. २०१८ ला सुरू केलेला हा प्रवास अजूनही सुरूच आहे. या प्रवासाची नोंद लिमका बुक आॅफ रेकार्डनेही घेतली आहे. व्यक्तीची किंवा मृताच्या नातेवाईकांची इच्छा असणे खूप महत्त्वाचे आहे. शाळा आणि महाविद्यालयांपासूनच याबाबत काम करणे महत्त्वाचे आहे, असे प्रमोद महाजन सांगतात.
सर्वसामान्यांची नेत्रदानाबाबत तयारी असते मात्र अवयवदान किंवा देहदानाबाबत तयारी नसते. अपघातामुळे मेंदूमृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांवर आघात झालेला असतो अशावेळी अवयवदान समजून घेण्याच्या अवस्थेत ते नसतात.
----------------
अवयदानाबाबत जनजागृती करणारे एखादे प्रकरण शालेय पाठ्यपुस्तकात असावे याबाबत संस्थेने शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे दहावीच्या विज्ञान विषयातील प्रकरणात अवयव प्रत्यारोपण आणि अवयव आणि देहदानाविषयी प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे.