पिंपरी : वाहतूक विभागाने हेल्मेटसक्तीचा काढलेला आदेश औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरात केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे. वाहतूक पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. शासकीय कार्यालयांमध्येही हेल्मेटसक्तीचा केवळ सोपस्कार पाळला जातो. शहरातून जाणाऱ्या तीन राष्ट्रीय महामार्गांवर आणि अंतर्गत रस्त्यांवर विनाहेल्मेट वाहने दामटली जात आहेत. हेल्मेट नसल्याने अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत.अपर पोलिस महासंचालकांनी २५ नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरात हेल्मेटसक्ती करावी, असा आदेश जारी केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी सुरू झाली नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. शहरातून १०.५ किलोमीटरचा निगडी ते दापोडीपर्यंत पुणे-मुंबई जुना राष्ट्रीय महामार्ग, ११.६ किलोमीटरचा गहुंजे ते वाकड असा बंगळुरू-मुंबई महामार्ग, १३.७ किलोमीटरचा दापोडी ते मोशी असा असा पुणे-नाशिक महामार्ग जातो. त्याचबरोबर शहरात २००० किलोमीटर रस्त्यांचे जाळे आहे. शहरामध्ये ९० टक्के दुचाकीचालक हेल्मेट वापरत नसल्याचे पाहणीत आढळून आले.काय आढळले पाहणीत...१) वाहतूक शाखेच्या वतीने सध्या हेल्मेटसक्तीबाबत कोणतीही कारवाई होत नाही.२) पिंपरीतील महापालिका, निगडीतील तहसीलदार, प्राधिकरणातील पीएमआरडीए, चिंचवड येथील एमआयडीसी अशा शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नाही.३) महापालिकेत हेल्मेट न घालून आलेल्याला प्रवेश दिला जात नाही. इतर कार्यालयांमध्ये कोणतीही तपासणी होत नाही.४) शहरातील राष्ट्रीय महामार्गावर ८० टक्क्यांहून अधिक दुचाकीचालक विनाहेल्मेट वाहने दामटत आहेत.बापरे, पोलिसही बिनधास्त!शासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेटसक्ती केली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अनेक कार्यालयांमध्ये होत नाही. सामान्य दुचाकीचालक आणि पोलिसही विनाहेल्मेट वाहने चालवत असल्याचे आढळून आले. निगडी पोलिस ठाण्याच्या बाहेर केलेल्या पाहणीत पोलिसही विनाहेल्मेट जाताना येताना दिसून आले. दहा वाहनांपैकी केवळ एखादा कर्मचारी हेल्मेट घालून बाहेर पडत असल्याचे दिसले.काय आहे नवीन आदेशात...राज्यातील पाच वर्षांतील रस्ते अपघातांचा आढावा समितीने घेतला होता. त्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पिलियन रायडर यांचे अपघात, मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी पुण्यात हेल्मेट सक्ती केली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ही सक्ती होत आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८, कलम १२९/१७७ नुसार हेल्मेट बंधनकारक आहे. हेल्मेट न वापरता वाहन चालविल्यास ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. आता नवीन आदेश काढला आहे. तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकीचालकावर कारवाई होत नसल्याचे दिसून आले. आता दुचाकीवरील दोघांवरही कारवाई केली जाणार आहे.अपघातांचे प्रमाण वाढले म्हणूनराज्यात दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ००० अपघात झाले. त्यात ००० जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबरदरम्यान २७१ अपघात झाले. त्यात २७८ जणांचा मृत्यू झाला. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने सूचना केल्या आहेत. पोलिसांनी कायद्याची प्रभावी व कडक अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले आहेत.हेल्मेट असल्याने धोका कमीदुचाकी वाहन चालवीत असताना हेल्मेटचा वापर करणे वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे. हेल्मेट असल्याने अपघात झालाच तर डोक्याला व चेहऱ्याला गंभीर इजा होत नाही. जीवितहानीचा धोकाही कमी होतो. बहुतांश अपघातग्रस्त दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्यावर हेल्मेट नसल्याने डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाले किंवा रस्त्यावर डोके आदळून जागेवरच मृत्यू पावले आहेत, असे आढळून आले आहे.कसे असावे हेल्मेटहेल्मेट डोक्यावर ओझ्यासारखे वाटेल, असे नसावे. ते घालताना आणि काढताना चेहरा आणि डोक्यावर दाब पडता कामा नये. त्यातील कुशन कठीण नसावे. जेणेकरून गाल आणि चेहऱ्याच्या दुसऱ्या भागाचे नुकसान होणार नाही. ते आयएसआय प्रमाणित असावे. त्यात हवा खेळती राहावी.या शहरांत हेल्मेटसक्ती यशस्वीदिल्ली आणि बंगळुरू शहरांमध्ये हेल्मेटसक्तीबाबत सामाजिक संघटनांनी प्रबोधन मोहीम राबविली होती. तेथे दंडात्मक कारवाईही प्रभावीपणे राबविली गेली आहे. त्यानंतर मुंबई आणि पुण्याचा क्रमांक लागतो. पिंपरीत कारवाईचे प्रमाण कमी आहे.
हेल्मेटसक्तीचा केवळ आदेश, कारवाईच्या नावानं चांगभलं!
By विश्वास मोरे | Updated: November 29, 2024 15:01 IST