पुणे (ओतूर) : रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने विवाह समारंभानिमित्त छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले नाही, मानपान मिळाला नाही, माईकवर नाव पुकारण्यात आले नाही म्हणून मोठ्याप्रमाणात रुसवे फुगवे बघायला मिळतात. मात्र पुणे जिल्ह्यातील पेठ परगावमध्ये मात्र फक्त ओळख लक्षात ठेवत दोन अमेरिकन महिलांनी एका विवाह समारंभाला हजेरी लावली होती. विशेष म्हणजे त्यांना पत्रिका न पाठवता कोणतेही आढेवेढे न घेता फक्त एका फोनवर त्या आल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ पारगाव येथील कृणाल व माधुरी यांच्या विवाहप्रसंगी अमेरिकेतील लॉस एंजलीस सिटीतील हॉले सुशानी व सिएटल सिटी येथून रॉक्सना नौरोजी या दोघीजणी हजारो किलोमीटरचा प्रवास करीत खास विवाहात हजेरी लावण्यासाठी उपस्थित होत्या.सन २०१५च्या सुमारास त्यांनी पुणे जिल्ह्यात तीन महिन्यासाठी ग्रामीण भागात एम.एस. डब्ल्यू अभ्यासक्रमासाठी पारगावची निवड केली होती. त्या अनुषंगाने गावातील नागरिकांशी त्यांचे ऋणानुबंध जुळले होते. यातीलच एक असणाऱ्या आचार्य कुटुंबाने त्यांना आमंत्रणासाठी फोन केला. याचा स्वीकार करत तब्बल दोन दिवसांचा प्रवास करून त्या लग्नाला आल्या आणि तेही मराठमोळ्या वेशभूषेत. साडी आणि इतर दागिने घालून त्यांनी उत्साहाने लग्नविधीत सहभाग घेतला. गावकऱ्यांनी प्रेमाने आणि आत्मीयतेने त्यांचे स्वागत करून पाहुणचार केला.