पुणे : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी (दि. ८) पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात नगण्य प्रतिसाद मिळाला. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते वगळता या बंदमध्ये जनता सहभागी झाल्याचे चित्र दिसले नाही.
या बंद दरम्यान मोर्चा काढण्यास पोलिसांनी यापूर्वीच परवानगी नाकारली होती. त्यामुळे महाआघाडीतील पक्षांनी आयोजित केलेला ‘टिळक चौक ते मंडईतील टिळक पुतळा’ हा मोर्चा टिळक चौकातच अडवण्यात आला. त्यामुळे ‘महाआघाडी’तील कार्यकर्त्यांनी चौकातच ठिय्या देत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तासाभराच्या घोषणाबाजीनंतर कार्यकर्ते पांगले.
पुणे बाजार समितीतले व्यवहार मात्र पूर्ण बंद राहिले. दररोज या बाजारात सुमारे ९०० ट्रक शेतमालाची आवक होते. मंगळवारी मात्र फक्त परराज्यातून आलेल्या १७५ ट्रक शेतमाल उतरवून घेण्यात आला. शेतकरी बंदला पाठींबा असला तरी मोर्चाची वेळ वगळता दुकाने बंद न ठेवण्याचे आवाहन व्यापारी महासंघाने केले होते. त्यामुळे दुपारनंतर बाजारपेठांमधील व्यवहार रोजच्याप्रमाणे चालू राहिले.
उपनगरांमध्ये बंदचा फार परिणाम दिसून आला नाही. मात्र कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जमून सकाळच्या वेळात केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील सार्वजनिक आणि खासगी वाहतूक व्यवस्थाही सकाळच्या पाऱ्यातील अपवाद वगळता रोजच्याप्रमाणे चालू राहिली.