पिंपरी : शाहू, फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं भलं फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहाच करू शकतात. केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही बावीस वर्ष प्रयत्न करत होतो. कोणीही डेरिंग केलं नाही. डेरिंग फक्त अमित शाहांनी करुन दाखवलं. म्हणूनच आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. मोदी आणि शाह फक्त हे दोघेच देशाचं नेतृत्व करू शकतात. सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी अमित शाह पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसेपाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी अजित पवार बोलत होते
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शाहांवर कौतुकाचा वर्षाव केला. शिंदे म्हणाले, ‘अमित शाहांनी एकदा निश्चय केला की, ते थांबत नाहीत. अमित शाहांकडून सहकार विभागात क्रांतीकारी निर्णय घेण्यात आले आहेत. शाहांचं सहकार क्षेत्रात मोठं योगदान आहे. नवं पोर्टल सहकार क्षेत्रातील नवा आयाम, सहकार क्षेत्रात कार्यकारी निर्णय घेतला आहे.त्यांचे नेतृत्त्व सहकार विभागासाठी वरदान आहे. फडणवीस म्हणाले, अमित शाहांकडून सहकारात मोठे बदल झाले आहेत. अमित शाहांना महाराष्ट्र खूप चांगला कळतो.’’
तुमच्यासाठी हीच जागा योग्य - अमित शाह
‘‘दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यादा पुण्यात आलो आहे. मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसलो आहे. पवार यांना सांगू इच्छीतो की खूप काळानंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात. तुमच्यासाठी हीच जागा योग्य होती, पण तुम्ही उशिर केलात.’’ त्यावर दादांनी हात जोडून आणि स्मित हास्य करून दाद दिली.