पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सरकारच्या निषेधार्थ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनाचा एक भाग म्हणून अलका टॉकीज चौकापासून जिल्हाधिकारी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेवक सुभाष जगताप, महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव, अश्विनी कदम, नंदा लोणकर, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, सुहास उभे उपस्थित होते. राज्य सरकारने दिलेली आश्वासने गेल्या ३ वर्षात पूर्ण केली नाहीत. त्याऐवजी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे अशी जोरदार टीका अजित पवार यांनी यावेळी केली. मोर्चामध्ये महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. जीएसटी रद्द झालाच पाहिजे, दुधाला भाव मिळायलाच हवा, अशा प्रकारचे फलक मोर्चातील कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हल्लाबोल आंदोलनाचा समारोप होणार आहे.
आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावीकोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाकडून ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचे अजित पवार यांनी स्वागत केले. न्यायालयीन प्रक्रियेत जास्त वेळ न घालविता या तिघा आरोपींना लवकरात लवकर फाशी लटकविण्यात यावे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.