राजीनाम्याचे गौडबंगाल शरद पवार यांनीच सांगावे, बारामतीत परिवर्तन अटळ- किरीट सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 09:16 AM2023-06-23T09:16:59+5:302023-06-23T09:20:24+5:30

भोरला भाजपच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन...

Only Sharad Pawar should say the Gaud Bengal of resignation, change in Baramati is inevitable - Kirit Somaiya | राजीनाम्याचे गौडबंगाल शरद पवार यांनीच सांगावे, बारामतीत परिवर्तन अटळ- किरीट सोमय्या

राजीनाम्याचे गौडबंगाल शरद पवार यांनीच सांगावे, बारामतीत परिवर्तन अटळ- किरीट सोमय्या

googlenewsNext

भोर (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजीनामा देतात आणि पुन्हा माघार घेतात. दुसरीकडे अजित पवार विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन संघटना सांभाळण्याची भाषा करतात. या राजीनाम्यामागे काय गौडबंगाल आहे, हे शरद पवार यांनीच सांगावे. २०२४ ला बारामती लोकसभा मतदार संघात परिवर्तन अटळ असल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.

येथील गंगोत्री हाॅलमध्ये नरेंद्र मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सोमय्या बोलत होते. यावेळी माजी आमदार शरद ढमाले, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, भोर शहराध्यक्ष सचिन मांडके, आण्णा देशमाने, स्वाती गांधी, दीपाली शेटे, अमर बुदागुडे, मनीषा राजीवडे, विश्वास ननावरे, पंकज खुर्द, नितीन सोनावले, कपिल दुसंगे, राजेंद्र गुरव उपस्थित होते.

किरीट सोमय्या म्हणाले, उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना पुणे येथे जम्बो कोविड सेटर संजय राऊत यांचे भागीदार सुजित पाटकर यांना पीएमआरडीएकडून चालवायला दिले. मात्र या कोविड सेंटरमध्ये तीनजणांचा मृत्यू झाला असून, ३२ कोटीपैकी २५ कोटी रुपये सेंटरचालक पीएमआरडीएकडून घेऊन गेले आहेत. या प्रकरणात घोटाळा झाला असून, हा पैसा कोणाकडे गेला? याचा लाभार्थी कोण? याची चौकशी ईडीकडून सुरू आहे. मात्र पुणे पोलिस कधी चौकशी करणार? असा सवाल त्यांनी केला. मुंबई महानगरपालिकेतही कोविड घोटाळा झाला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. राज्यात २८ घोटाळे बाहेर काढले. त्यांची चौकशी सुरू असून, कोणी जेलमध्ये आहेत, कोणी बेलवर बाहेर आहेत, तर काही प्रकरणे न्यायालयात सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

तालुका भाजपाध्यक्ष जीवन कोंडे यांनी मोदी सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, जलजीवन मिशन अशा विविध योजनांसाठी १३४५ कोटी निधी आला, मात्र त्याचे श्रेय काँग्रेस राष्ट्रवादी घेत असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात भोर शहर भाजपाध्यक्ष सचिन मांडके यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची सविस्तर महिती दिली. सूत्रसंचालन विक्रम शिंदे यांनी केले, तर आभार अमर बुदगुडे यांनी मानले.

Web Title: Only Sharad Pawar should say the Gaud Bengal of resignation, change in Baramati is inevitable - Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.