विरोधी पक्षांच्या आरोप, मोर्चे, आंदोलनांसारख्या जोरदार हल्ल्यांवर पालकमंत्र्यांचे फक्त मौन : शहर भाजपाची होतेय कुचंबणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 07:55 PM2019-01-28T19:55:39+5:302019-01-28T19:58:09+5:30
हेल्मेट सक्ती असो, पाणी असो, वाहतूकीची समस्या असो कशावरच बापट काहीच बोलायला तयार नाही.
पुणे: वेगवेगळ्या समस्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेससह शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष पालकमंत्री गिरीश बापट यांना पेचात पकडत आहेत. आरोप, मोर्चे, निदर्शने, राजीनाम्याची मागणी होत आहे. तरीही बापट काहीच प्रत्युत्तर करत नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेची राजकीय कुचंबणा होत आहे. पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याची कुजबूज पक्षात सुरू झाली आहे.
शहराचा खासदार, आठ आमदार, पक्षाचे १०३ नगरसेवक व महापालिकेत स्पष्ट बहुमत, राज्यात सत्ता, केंद्रातही सत्ता असे असल्यामुळे शहरात भाजपाचे राजकीय वर्चस्व आहे. पालकमंत्री म्हणून बापटच पक्षाचे शहरातील प्रमुख आहेत, मात्र गेले काही वर्षभर सातत्याने ते वादविषय होत आहेत. हिरव्या देठापासून जी सुरूवात झाली ती थांबायलाच तयार नाही. अगदी अलीकडे तर शहराच्या पाण्याच्या विषयावरून ते वादात सापडले आहेत. मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री असूनही जलसंपदाने त्यांच्या शहराचे पाणी तीन वेळा तोडण्याचा प्रताप केला. पुण्याचे पाण्यावर संक्रात आणण्याचा पणच केल्यासारखे जलसंपदाचे अधिकारी वागत आहेत.
त्यामुळे जलसंपदाच्या विरोधात भाजपाचेच खासदार अनिल शिरोळे यांनी महापालिका भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता तर महापौर मुक्ता टिळक तसेच महापालिकेतील भाजपाच्या अन्य पदाधिकाºयांनीही जलसंपदावर तीव्र शब्दात टीका केली. महापौरांनी तर जलसंपदाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. तरीही बापट यांनी मात्र यावर काहीच भुमिका घेतली नाही. फारच टीका होऊ लागल्यावर त्यांनी एक सर्वपक्षीय बैठक आयोजित केली, मात्र त्यातही त्यांनी गोलमटोल भुमिका घेत शेवटी काहीच निर्णय घेतला नाही. हेल्मेट सक्ती असो, पाणी असो, वाहतूकीची समस्या असो कशावरच बापट काहीच बोलायला तयार नाही.
त्यातच रेशनिंग प्रकरण जाहीर झाले. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यासंबधीच्या निकालात बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला असे स्पष्ट शब्दात खडसावले आहे. तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दोषी ठरवेलेल्या रेशनिंग दुकानदाराला त्याचा परवाना परत करण्याचे हे प्रकरण आहे व त्यात बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केला असे दिसते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे व आम आदमी पार्टी या सर्वच राजकीय पक्षांनी बापट यांच्या विरोधात वेगवेगळे मोर्चे काढले, निदर्शने केली, धरणे धरले व बापट यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनात अनेक आरोप, टीका करण्यात आली. पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली तर पक्षाच्या शहर शाखचे अध्यक्ष योगेश गोगावले यांनी लगेचच काकडे यांचा निषेध केला. दानवे यांच्या मदतीला धावली तशी शहर शाखा बापट यांच्या मदतीला मात्र धावायला तयार नाही. ते काही बोलत नाही तर आम्ही कसे मध्येच बोलणार असे शहर शाखेतील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाण्याच्या समस्येला आम्हाला तोंड द्यावे लागते आहे हे माहिती असूनही ते जलसंपदा मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना काही सांगत नसतील तर त्यांना साह्य कसे करावे असा प्रश्न महापालिकेतील पदाधिकारीही विचारतात.
बापट यांचे हे मौन आता भाजपाच्याच कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय झाले आहे. त्यांनी सर्व आरोपांना खडसून उत्तर दिले पाहिजे असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यावरील आरोपांना तेच प्रत्युत्तर देऊ शकतात, अन्य पदाधिकारी कसे देतील असे कार्यकर्त्यांना वाटते. त्यांच्यातीलच काहींनी पक्षाच्या प्रतिमेवर बापट यांच्या या मौनाचा अनिष्ट परिणाम होत असल्याचे मत व्यक्त केले. इतके मोठे राजकीय वर्चस्व असतानाही केवळ बापट यांच्यामुळे पक्षाला बॅकफूटवर जाणे भाग पडते आहे असे या दुसºया फळीतील कार्यकर्त्यांनी सांगितले.
---------------------
खुलासा घेतला मागे
रेशनिंग प्रकरणावर बापट यांच्या कार्यालयाने एक खुलासा माध्यमांना पाठवला होता, मात्र तो लगेचच मागे घेण्यात आला. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, खुलासा प्रसिद्ध करू नये असे माध्यम प्रतिनिधींना कळवण्यात आले. त्यामुळे बापट यांचे मौन अधिकच प्रसिद्ध झाले आहे.
...................
राजकारणाचाच भाग
शांत बसणे हा बापट यांच्या राजकारणाचाच भाग असल्याचीही चर्चा आहे. प्रत्यूत्तर देत बसले तर विषय वाढतो, न दिले तर लोक ते विसरून जातात याविचाराने बापट यांनी सर्व आरोपांवर चुप्पी बाळगली असल्याचे त्यांच्या निकटच्या समर्थकांनी सांगितले