पुणे : समाजातील सर्व उपेक्षित, शोषित, मागास समाजाला आरक्षणाची गरज आहे. सत्ता मिळाली तर वंचित बहुजन आघाडीच हे आरक्षण मिळवून देऊ शकते, असे प्रतिपादन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आंबेडकर यांनी आभासी पद्धतीने आपले उमेदवार व कार्यकर्ते यांच्याबरोबर संवाद साधला. नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानात या जोशाबा महासंकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते.वंचितचे पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार नीलेश आल्हाट, कसबाचे उमेदवार प्रफुल्ल गुजर, वडगाव शेरीचे विवेक लोंढे, शिवाजीनगरचे परेश शिरसंगे, कोथरूडचे योगेश राजापुरकर, खडकवासलाचे संजय धिवार, पर्वतीच्या सुरेखा गायकवाड, हडपसरचे अॅड. अफरोज मुल्ला, पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद तायडे यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते. सर्व उपस्थितांना अॅड. आंबेडकर यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
आंबेडकर म्हणाले, 'इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) टक्केवारी माहीत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण थांबविले आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचेही आरक्षण थांबवले आहे. आरक्षणाचे वर्गीकरण करून क्रिमिलेयर लावण्यात आले आहे.भाजपप्रमाणेच काँग्रेसचाही आरक्षण संपविण्याचा प्रयत्न आहे. आरक्षण वाचवायचे असेल तर मतदारांनी वंचितच्या उमेदवारांना मतदान करावे. द्वेष पसरविण्यास प्रतिबंध करणारे महम्मद पैगंबर विधेयक मंजुरीची गरज आहे.