महाविकास आघाडीचे नेतेच करताहेत अजितदादांना बदनाम - चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 12:21 PM2023-04-22T12:21:56+5:302023-04-22T12:25:19+5:30
स्वाती माेहाेळ पक्षप्रवेशाची माहितीच नाही....
पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मला भेटले नाहीत. अजित पवार यांना जाणीवपूर्वक पहाटेच्या शपथविधीपासून त्यांच्या जीवनावर, त्यांच्या भूमिकेवर आणि कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. महाविकास आघाडीतील नेतेच अजित पवार यांना जाणीवपूर्वक बदनाम करीत आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांचा भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश झाला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील एक लाख पक्षाच्या बूथवर आम्ही प्रत्येकी पंचवीस पक्षप्रवेश घेत आहोत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पक्ष कार्यालयात प्रत्येक मंगळवारी पक्षप्रवेश होत आहे. त्यानुसारच येणाऱ्या मंगळवारीदेखील साजेसा असा पक्षप्रवेश आहे. त्यामुळे मंगळवार हा भाजपाचा पक्षप्रवेशाचा दिवस निश्चित झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वाती माेहाेळ पक्षप्रवेशाची माहितीच नाही
तसेच ते पुढे म्हणाले की, मला कालच्या पक्षप्रवेशाबाबत काही माहिती नाही. एखाद्या कार्यकर्त्याबाबत मागील काळात काय घडले, त्याबद्दल आमचे फार काही मत नाही; पण २०३५ पर्यंत सर्वोत्तम भारताचा मोदींनी जो संकल्प केला आहे. त्या संकल्पनेला जो कोणी साथ देण्यास तयार असेल, त्या व्यक्तीला आम्ही पक्षप्रवेश नाकारत नाही. त्या कार्यकर्त्यांने पक्षाच्या शिस्तीत आणि देशासाठी काम केले पाहिजे, अशी भूमिका स्वाती मोहोळ यांच्या पक्षप्रवेशावर त्यांनी मांडली.
राज ठाकरे भाजपाचे कधी पोपट होऊ शकतात का ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाजपाचा पोपट म्हणून राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे कौतुक केल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. उद्धव ठाकरे यांच्या कामावर टीका केल्यावर ते भाजपाचे पोपट होतात. त्यामुळे राज ठाकरे भाजपाचे कधी पोपट होऊ शकतात का, असा सवाल करीत आमचे कधी चुकले तर त्या विरोधात देखील राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.