श्रीकिशन काळे
पुणे : आजचे शिक्षण एकदम रुक्ष आहे. ते मुलांना डाचत असते. त्यामुळे पोरंही रुक्ष होत जातात. खरंतर शिक्षकांनी मुलांना सांगितले पाहिजे की, पहाटे फुल कसे उमटले ते पहा? कळीची एक-एक पाकळी कशी फुलते ते पहा. निसर्गातील घटकांचे निरीक्षण करा. टेकड्या, बागा, किल्ल्यांवर भटकंती करा. डोळे आहेत तर शोधलं पाहिजे, तरच मुलांचे शिक्षण आणि आयुष्य आनंददायी होईल, असा सल्ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांनी शिक्षक, पालक, मुलांना दिला.
बालदिनानिमित्त सोमवारी (दि. १४) नवी दिल्लीत संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात येईल. त्यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्या म्हणाल्या की, आज पुण्यातून दिल्लीला येताना खूप छान वाटतंय. मी मन लावून लिहित गेले. त्यापासून काही अपेक्षा मनात ठेवल्या नव्हत्या. माझ्यातही एक मूल दडलेले आहे. त्यामुळे ‘पियूची वही’ लिहिताना ते मुलांना आवडेल असे वाटले होते. मला स्वत:ला ते आवडले होते.
माझं बालपण गावाकडे गेलं. त्यामुळे निसर्ग जवळून अनुभवला. गेली चाळीस वर्षे शहरात राहतेय. शहरातही निसर्ग अनुभवता येतो. कुंडीत रोज कळी कशी उमलते ते पाहता येते. बागेत रोपं असतात. कळीचे फुल कसे हाेते, ते पाहण्यासाठी मी स्वत: पहाटे ३ वाजता उठून रोपासमोर तासनतास बसले आहे. कळी उमलतानाचा आनंद उपभोगला आहे. मनातून इच्छा असेल तर आपल्याला गावातील निसर्ग शहरात मुलांना दाखविता येतो.
गावाकडे मुले शाळेत जाताना आजूबाजूला झाडे असतात, हिरवळीतून जातात. शाळाही सुंदर असते. तिथे काही नियम नसतात. त्यामुळे ती चांगल्याप्रकारे मोकळी वाढतात. त्याच धर्तीवर शहरातील मुले मात्र बंदिस्त वाटतात. त्यांनाही पालक आनंद देण्यासाठी प्रयत्न करतात. पण टीव्ही, मोबाइलमुळे ती निसर्गात जात नाहीत. त्यांना मोकळे जगू द्यावे.
बालसाहित्य हे मुलांपर्यंत पोहचविले पाहिजे. त्यातील कविता मोठ्या वाचू शकतो, सादर करू शकतो, हे मुलांना सांगायला हवे. आजही मुले लिहीत आहेत. शाळा, शिक्षक प्रयत्न करत आहेत. फक्त झालंय काय इंग्रजी माध्यम खूप वाढलंय. मराठी लिहिणं कमी होत आहे. तरी पालक मराठीत प्रयत्न करतात. पाठ्यपुस्तकांशिवाय मुलांनी पुस्तके वाचावीत. त्यावर गप्पा माराव्यात. पाठ्यपुस्तक मंडळानेच अशी पुस्तक अभ्यासाला ठेवावीत. तरच खऱ्या अर्थाने मुले आनंददायी शिक्षण घेतील.
मुलगी अन् आईदेखील म्हणू लागली मराठी गाणी
ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार... या इंग्रजी गाण्याकडे मुलं वळतात. पण आपण त्यांना मराठी गाणी दिली पाहिजेत. माझ्या घराशेजारी एक छाेटी मुलगी इंग्रजी कविता वाचत होती. ते मी पाहिले. ती मराठी मात्र कविता वाचत नव्हती. मग मीच तिला गाणी हाताने लिहून दिली, तर तिने ती गाणी छान म्हटली. तिची आई सुद्धा म्हणायला लागली. तिच्याकडे मराठी गाणी नव्हती; पण आपण ती मुलांना दिली पाहिजेत. हे काम शिक्षक, पालक सर्वांचे आहे.