लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : साठ वर्षांहून अधिक वयाच्या सुमारे २५ टक्के व्यक्ती आवडीनिवडी जोपासत आहेत. ३१ टक्के पुरुष आणि १९ टक्के स्त्रिया करिअर सांभाळत आहेत. ३६ टक्के स्त्रिया सोशल मीडियावर दररोज चार तासांपेक्षा जास्त वेळ घालवतात. ‘खरे आयुष्य ६० वर्षांपासून सुरू होते; काम नाही, फक्त आराम देणारी ही सर्वोत्तम वर्षे आहेत’, असे ४५ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. एका खासगी संस्थेच्या वतीने ‘द पॉझिटिव्ह एजिंग रिपोर्ट’ अर्थात सकारात्मक वृद्धत्वाचा अहवाल सादर केला. त्यातून वरील निष्कर्ष समोर आले आहेत.
सेवानिवृत्तीनंतर आराम करायचा असतो, असा सार्वत्रिक समज असताना, आजच्या अनेक ज्येष्ठ नागरिकांची निवृत्त होण्याची अजिबात इच्छा नाही. वृद्धत्वाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत त्यांना करिअरचे नवीन मार्ग शोधायचे आहेत, आवडी-निवडी जोपासायच्या आहेत. अहवाल २१ आॅगस्ट रोजी साजरा केला जाणा-या ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’चे औचित्य साधून प्रकाशित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बदलत्या आकांक्षा, गरजा आणि २१ व्या शतकात युवकांच्या तुलनेत त्यांचा स्वत:चा वृद्धत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याचे चित्रण या अहवालात करण्यात आले आहे.
इनोव्हेटिव्ह रिसर्च सर्व्हिसेस (इंडिया) प्रा. लि. या कंपनीने वृद्धांच्या प्रत्यक्ष व दूरध्वनीवरून घेतलेल्या मुलाखतींच्या आधारावर अहवाल तयार केला. यासाठी पुणे, मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबादमधील दोन हजारांहून अधिक नागरिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. “भारतीय ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र आणि आकांक्षावादी आयुष्य जगायचे असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते. भारतात साठपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या ८ टक्के आहे. सन २०५० पर्यंत या वृद्धांची संख्या जवळजवळ दुप्पट होईल. ६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांची संख्या त्यावेळी ३१ कोटी इतकी असेल,” असे ‘कोलंबिया पॅसिफिक कम्युनिटिज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित निरुला यांनी सांगितले.