बारामती: बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र, ‘पॉझिटिव्हीटी’ दर पाच टक्क्यांच्या आत राहिल्यानंतरच निर्बंध आणखी शिथिल केले जातील, प्रशासनाने पुढील दोन दिवसांनी परस्थिती पाहून निर्णय घ्यावा, यासाठी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जावा,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुभार्वाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लस जास्तीत जास्त उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यात यावे. म्युकरमायकोसिसची लक्षणे, काळजी, उपचार यांची माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवावी,असे पवार म्हणाले.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
हिराभाई बुटला विचारमंच यांच्याकडून फिरता दवाखाना (मोबाईल क्लिनिक व्हॅन) चे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुटाला विचारमंचाचे कौस्तुभ बुटाला आणि प्रतिभा हांडेकर हे उपस्थित होते. तसेच दाना इंडिया टेक्निकल सेंटर प्रा.लि. हिंजवडी, पुणे यांच्या उरफ फंडातून व मिलिंद वालवाडकर यांच्या प्रयत्नातून बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयास मिनी व्हेंटिलेटर (पोर्टेबल बायपास) देण्यात आले. त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमेरीकेचे डॉ. दीपेश राव यांच्याकडून म्युकर मायकोसिस साठी लागणाऱ्या इंजेक्शनचे २५ डोस रुई ग्रामीण रुग्णालयास उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.