पुणे : सवाई गंधर्व महोत्सवाच्या आयोजकांनी वेळेवर बोट ठेवत रंगलेली मैफल आटोपती घेण्यास सांगितल्याने ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे नाराज झाल्या. किमान तासभर मिळणार असेल तरच पुढील वर्षी सवाईमध्ये गाईन, असे त्यांनी आयोजकांना सुनावले. नव्यांबरोबरच ज्येष्ठ गायकांचाही सन्मान करा, त्यांना योग्य तो मान द्या, असे त्या म्हणाल्या.किराणा घराण्याच्या पाईक या नात्याने स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्यानंतर ज्येष्ठ गायिका म्हणून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता डॉ. प्रभा अत्रे यांच्या मैफलीने होते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नव्हते. मात्र त्यांचे गाणे ऐन रंगात आलेले असताना ध्वनिक्षेपकाची मर्यादा उलटल्यामुळे या ‘स्वरयोगिनी’ला मैफल थांबविण्यास सांगण्यात आले. यासंदर्भात डॉ. प्रभा अत्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नियोजनावरच प्रश्नचिन्ह उभे केले. माझ्यासारख्या ज्येष्ठ कलाकाराला ११.१५ वाजता स्वरमंच उपलब्ध होतो आणि गाण्यास केवळ पाऊण तास मिळतो. बारा वाजले, की आयोजक शेजारी गाणे बंद करण्यासाठी उभे राहतात, ही पद्धत झाली का? हा बुजूर्ग कलावंताचा अपमान नाही का? खूप वर्षे मी हे सहन केले, आज मात्र बोलावे लागले. काही नवीन रचना घेऊन आम्ही रसिकांसमोर आलेलो असतो. मात्र आमचा विरस तर होतोच, पण रसिकांचाही रसभंग होतो, असे त्या म्हणाल्या.
...तरच पुढील वर्षी ‘सवाई’मध्ये गाईन!
By admin | Published: December 15, 2015 1:46 AM