शास्त्रज्ञ डॉ. तांदळेपुणे : भारतात कोरोना विषाणूची लागण झालेले तीनही विद्यार्थी वुहानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यापैकी दोघांना आता घरी सोडण्यात आले आहे. पण त्याआधी त्यांच्या संपर्कात आलेल्या भारतातील कुणालाही कोरोनाची लागण झाली नाही. त्यामुळे सध्या केवळ चीन व इतर बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना ‘कोरोना’चा धोका आहे. इतरांनी घाबरून जाण्याची गरज नाही, अशी माहिती राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. तांदळे यांनी दिली.
पत्रकार परिषदेत डॉ. तांदळे म्हणाले, ‘भारतात या कालावधीमध्ये नेहमीच श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होते. त्यामुळे अशी लक्षणे आढळली की घाबरण्याचे कारण नाही. कोंबडी किंवा अन्य कोणत्याही प्राण्यापासून कोरोनाचा संसर्ग होत नाही. सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांव्यतिरिक्त अन्य कोणीही मास्क वापरण्याची गरज नसल्याचे तांदळे यांनी स्पष्ट केले.