पुणे : शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खुडे ब्रिज खालील नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले असून त्यांनी दोन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर त्यांनीच पोलिसांना याची माहिती दिली होती.
महेश शिवाजी देव उर्फ तंबी (वय ३०) आणि आकाश प्रकाश यादव (वय ३३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता १ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. खून झालेल्या व्यक्तीची ओळख मात्र अजूनही पटली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी शिवाजीनगर येथील नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी घटनेची नोंद करून शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी करून तांत्रिक तपास केला असता वरील दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली होती. त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली. वाटमारीचा उद्देशाने त्यांनी सुरुवातीला त्या व्यक्तीला अडवले आणि त्यांनी विरोध केला असता धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनीच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून नदीपात्रात मृतदेह पडला असल्याची माहिती दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.