दीपक जाधव पुणे : प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीमध्ये शिकणाऱ्या लहानग्यांना मनोसक्त खेळायला, बागडायला, मित्र-मैत्रीणींसोबत मस्ती करायला खूप आवडते. शाळेमध्ये खेळण्यासाठी आठवड्यातून तास कमी करण्यात आल्याने शाळेतील बहुतांश वेळ केवळ पुस्तकी ज्ञान मिळविण्यासाठी खर्ची घालावा लागणार आहे. या वेळापत्रकात बदल करून प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जास्त तासिका उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात आली आहे. विद्या प्राधिकरणाच्या वतीने प्राथमिक शाळांचे वेळापत्रक निश्चित केले जाते. प्राथमिक शाळेत आठवड्याला ४५ ऐवजी ४८ तासिकांचे वेळापत्रक बनविण्यात आले आहे. त्यावेळी खेळायला वाढीव तास देण्याऐवजी ते कमी करण्यात आले. पहिली व दुसरीसाठी आठवड्यातून ४ आणि तिसरी व चौथीसाठी आठवड्यातून ३ तास ठेवण्यात आले आहेत. खेळायचे तास कमी असल्याने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण बोजड व नीरस वाटू लागल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. एकीकडे सीबीएसई, आयसीएसई शाळांच्या बोर्डांकडून शाळेच्या वेळापत्रकामध्ये खेळांच्या तासाला विशेष महत्त्व दिले आहे. त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांच्या शाळांना देण्यात आले आहेत. विद्या प्राधिकरण मात्र त्याबाबात उदासीन आहे. दुसरीकडे, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळेमध्ये मात्र विद्यार्थ्यांनी खेळासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा, याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डाने शालेय वेळापत्रकात दररोज पीटीचा तास ठेवण्याच्या सूचना सर्व शाळांना दिल्या आहेत. विद्यार्थी वर्गात बसून राहणार नाहीत, याकडे लक्ष देण्याच्या मार्गदर्शक सूचनाही त्यांनी त्यांच्या सर्व शाळांना पाठविल्या आहेत. यामध्ये शारीरिक शिक्षणाचा तास वर्गाबाहेर मैदानातच घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांकडून करून घ्यावयाच्या शारीरिक कवायतींचा एक चार्टदेखील शाळांना पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर, ते आपला आवडता खेळ खेळण्यासाठीही त्यांना वेळ देण्यास सांगण्यात आले आहे. पीटी विषयाची अन्य विषयांप्रमाणे परीक्षा घेऊन नये.विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षण निरस वाटू नये, त्यांना शाळेत जाण्यासाठी उत्साह वाटावा, यासाठी समवयस्क मित्रांसोबत त्यांना भरपूर खेळायला मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लहानग्यांमध्ये वाढत असलेल्या लठ्ठपणाचे प्रमाण कमी होऊन ती शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी खेळाचे तास जास्त असणे आवश्यक असल्याचे मत यापूर्वी अनेकदा शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाचे तास वाढविण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे........................लठ्ठपणाचे वाढतेय प्रमाणप्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींमध्ये विविध कारणांमुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. इतक्या लहान वयातच त्यांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत असल्याने भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने गंभीर परिणामांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे लहान वयातच त्यांना जास्तीत जास्त खेळाकडे वळविले जाणे आवश्यक असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली....................शाळेतच मोबाईलपासून दूरमुले-मुली घरी गेल्यानंतर जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर गेम खेळण्यामध्ये घालवत आहेत. मैदानांवर जाऊन खेळण्याचे त्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये मुले-मुली मोबाईलपासून कटाक्षाने दूर असतात; त्यामुळे शाळेमध्येच त्यांना खेळण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणे योग्य ठरेल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे.
प्राथमिक शाळांमध्ये आठवड्यात फक्त तीन तास खेळाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 1:54 PM
खेळायचे तास कमी असल्याने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण बोजड व नीरस वाटू लागल्याची शिक्षकांनी तक्रार केली आहे.
ठळक मुद्देआम्ही खेळायचे कधी? : प्राथमिक शाळांच्या वेळापत्रकात बदलाची मागणीसीबीएसई, आयसीएसई शाळांच्या बोर्डांकडून शाळेच्या वेळापत्रकामध्ये खेळांच्या तासाला विशेष महत्त्वशारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी खेळाचे तास जास्त असणे आवश्यक