पुणे : अवघे बारा वर्षांचे वयोमान अन् २५२ किल्ल्यांची सफर...गडकिल्ल्यांचे वेड असावे तर असे. वडिलांचे प्रोत्साहन आणि साथ असल्याने जय राहुल दिवटे या बालकाने ही कामगिरी केली आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेरील किल्लेही त्याने पाहिले आहेत.
आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेला ऐतिहासिक वारसा, वास्तू, शिल्पकला, गडकिल्ले, मंदिरे जपण्याचे काम शासन, इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमींकडून अव्याहतपणे सुरुच आहे. त्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण आपल्या कुटुंब, मित्रांसह अशा ऐतिहासिक स्थळांना भेटी देत तेथील महती, निसर्ग सौंदर्य अनुभवत असतात. मांजरी बुद्रुक येथील १२ वर्षीय व पायोनियर पब्लिक स्कुलमध्ये जेमतेम सहावीत शिकणारा राहुल वडिलांच्या सोबत मागील काही दिवसांपासून गडकिल्ले फिरत आहे.
राज्यासह परराज्यातील विविध ऐतिहासिक किल्ले,ठिकाणांना मागील अनेक वर्षांपासून भेटी देत त्यांची माहिती संकलित केली आहे. ती माहिती इतरांपर्यंत विविध माध्यमातून पोहचविण्याचा प्रयत्न तो करत आहे. जयने १२ वर्षे वय असतानाच राज्यातील २३० किल्ले, कर्नाटकातील ७ व गोव्यातील १५ किल्ल्यांची सफर केली आहे.
अवघड किल्लेही सर
आतापर्यंतच्या किल्ल्यांपैकी आव्हानात्मक असणारे गडकोट चंदेरी, पदरगड, गोरखगड , जीवधन, शिंदोळा, ढाकोबा तसेच १०० पेक्षा जास्त लेणी, गुहा सह महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील विविध गडकोट,किल्ल्यांना जय ने आपल्या वडिलांसमवेत भेटी दिल्या आहेत.
बानकोट आवडता किल्ला
जयचा सर्वात आवडता किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील बानकोट व गोव्यातील कॅबो द रामा हा आहे. महाराष्ट्रामध्ये ६ भैरवगड आहेत. त्यातील सर्वात अवघड ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातील मोरोशीचा भैरवगड आहे, तो सुद्धा सर करण्याचा पराक्रम जय दिवटे याने केला आहे. त्याच उमेदीने येथून पुढे ही गड,किल्ल्यांना भेटी देण्याचे काम अविरतपणे सुरूच ठेवणार.