पुणे : सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये चारशे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मागील सहा महिने या भागात तीन दिवसांतून एकदा फक्त वीस मिनिटे पाणी येते, असे येथील नागरिकांनी सांगितले. मात्र महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी पाणीपुरवठा सुरळीत चालू असल्याचा दावा करत आहेत. पाणी नक्की मुरतंय कुठं असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये आठ इमारती आणि पाच बैठी घरांची लाईन असे मिळून चारशे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या भागात महानगरपालिकेच्या तीन लाख लिटरच्या दोन टाक्या आहेत. तर प्रत्येक इमारतीवर दोन टाक्या बांधून दिल्या आहेत. पर्वती जलशुद्धीकेंद्रावरून येथे पाणीपुरवठा होत असतो. त्यांनतर या दोन टाक्यांमध्ये पाणी भरले जाते. पुढे पाणी मोटरच्या साहाय्याने इमारतीच्या टाकीमध्ये सोडले जाते.उन्हाळ्यापासून आम्ही या समस्येला सामोरे जात आहोत. सहा महिन्यांपूर्वी देखील अशीच स्थिती होती. तेव्हा तीन दिवसांतून एकदाच पाणी येत होते. पण ते एक तासभर येत असे. आता मात्र वीस मिनिटे पाणी येते. महानगरपालिकेच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत. तर इमारतीवरील टाक्या कशा भरतील असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक नगरसेवक आणि आम्ही सर्वांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार केली. पालिकेचे अधिकारी येऊन पाहणी करून जातात. पण त्यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा काढत नाहीत...................सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये पर्वती आणि लष्कर जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा केला जातो. दररोज आमच्याकडून ११ ते ३ यावेळेत सुरळीत पाणीपुरवठा होतो. पूर्ण पोलीस लाईनमध्ये पाणी पुरवण्याचे काम त्या भागात नेमून दिलेला लाईन दफेदार करतो. त्या भागातील नागरिकांनी पाण्याचे मीटरही बसवून दिले आहेत. पण ते नादुरुस्त आहेत. त्यामुळे त्यांचा पाण्याचा वापर अथवा त्यांना पाण्याची किती गरज आहे. हे आम्हाला कळत नाही. शहराला पाणी सोडणाºया वॉलने पोलीस लाईनीत पाणी सोडले जाते. पाणीपुरवठा सुरळीत नियोजित वेळेत पुरवला जातो. याची आमच्याकडे नोंदी आहेत.- सूर्यकांत जमदाडे, उपअभियंता स्वारगेट पाणीपुरवठा केंद्र
पोलीस लाईनमध्ये येते तीन दिवसांतून वीस मिनिटे पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 11:49 AM
नागरिकांना त्रास : अधिकाऱ्यांचा मात्र पुरवठा सुरळीत असल्याचा दावा..
ठळक मुद्देसोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये चारशे कुटुंबीय वास्तव्यास