कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले यावरुन ओतूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये सोमवार दि.५ एप्रिल रात्री आठपासून ओतूर पोलिसांकडुन शासनाने निर्बंध घालून दिलेल्यापैकी अत्यावश्यक सेवा वगळता ईतर सर्व प्रकारची दुकाने,व्यावसाय बंद ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या.
मात्र जेथे सूचनेचे पालन केले गेले नाही अशा दुकानदारांवर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले आहे.
३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल. लोकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन देखील लावण्याचा निर्णय झाला असल्याने बाजारपेठांतील दुकानदारांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे कांबळे यांनी बोलताना सांगितले.
'ब्रेक दि चेन' या मिशनची सुरुवात झाली असून या मिशनमध्ये फक्त
अत्यावश्यक सेवा सुरु राहतील आणि निर्बंध घालून दिलेले व्यवसाय बंद राहतील. शेती व शेतीविषयक कामे,औषधे,अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहणार आहे. रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी असल्याने सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील. तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील असेही पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पहावे या नियम व अटींवर आवश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार आहेत.
पूर्ण लॉकडाऊन न परवडणारे असल्याने सर्वसामान्य नागरिक आपली व आपल्या आरोग्याची काळजी घेऊन प्रशासनाने घालून दिलेले नियम व निर्बंध पाळतील. दुकानदार व व्यावसायिकांच्या कोविड टेस्ट करुन घेण्याचे काम सुरु असून सर्वच दुकानदारांच्या टेस्ट करण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे तर याकरिता ग्रामपंचायत प्रशासन जनजागृती करीत असल्याचे ओतूरचे उपसरपंच प्रेमानंद अस्वार यांनी सांगितले आहे.
ओतूरमधील अनेक छोट्या-मोठ्या दुकानदार,व्यावसायिकांची धांदल उडाली तर पोलिस गाडी येताच बाजारपेठेतील दुकाने बंद करण्यासाठी दुकानदारांनी एकच गडबड घाबरगुंडी उडाली.
ओतूरचे किराणा व्यापारी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पन्हाळे यांनी सांगितले. दरम्यान छोट्या व्यावसायिकांना शासनाच्या मिनी लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका बसला असून केश कर्तनालय, रसवंती गृह, मिसळ हाऊस,हॉटेल,स्टेशनरी,रस्त्यावर विविध वस्तू विक्री करणारे, कापड विक्रेते , चप्पल विक्रेते,टेलरिंग,वडा पाव, पाणीपुरी,चहा विक्रेते व हातगाडीवर जे जे व्यावसाय केले जात आहेत असे गरीब घटकात मोडणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसून त्यांच्यावर बेरोजगारीची व पर्यायाने उपासमारीची वेळ आली असल्याचा सूर छोट्या व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळून इतर छोटे व्यावसाय बंद करताना ओतूर पोलीस कर्मचारी.