लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाने ५ नोव्हेंबरला राज्यातील नाट्यगृह खुली करण्याचे आश्वासन दिले आहे; परंतु जर त्या दिवसापासून नाट्यगृह सुरू झाली नाहीत, तर पुण्यात गर्दीच्या रस्त्यांवर आणि चौकाचौकात जाहीर ‘शो’ केले जातील, असा इशारा लोककलावंतांनी दिला आहे. मंडई, तुळशीबाग किंवा राजकीय कार्यक्रमांना झालेली गर्दी चालते, तेव्हा कोरोना पसरण्याची भीती नसते. मग ओपन शो आणि नाट्यगृहामधूनच कोरोना पसरतो का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘ती’चा गणपतीच्या निमित्ताने ‘नाट्यगृहाचा पडदा लवकरात लवकर खुला होऊ दे आणि कलाकारांच्या हाताला काम मिळू दे’ अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी करण्यात आली.
‘लोकमत ‘ती’चा गणपती’ची आरती प्रसिद्ध लावणी नृत्यांगना माया खुटेगावकर, संगीता लाखे, स्वाती शिंदे, अक्षता मुंबईकर, अर्चना जावळीकर, प्राची मुंबईकर यांच्या हस्ते मंगळवारी झाली. यंदा ‘ती’चा गणपतीची ‘संकल्प सिद्धी’ ही संकल्पना आहे. यावेळी कलाकारांच्या हाताला काम मिळण्यासाठी नाट्यगृह सुरू होऊ दे, असा संकल्प त्यांनी केला. यावेळी निर्माते शशिकांत कोठावळे आणि गणेश गायकवाड उपस्थित होते.
-------------------------------------------
गेली दीड वर्षे कलाकारांच्या हाताला काम नाही. लोककला क्षेत्रातील महिलांचे शिक्षण फारसे झाले नसल्याने त्या कलेशिवाय दुसरे कोणतेच काम करू शकत नाहीत. मी देखील लॉकडाऊन काळात ब्युटी पार्लरचा कोर्स केला आणि पार्लरचे घरोघरी जाऊन काम करीत होते.
- माया खुटेगावकर, प्रसिद्ध लावणी नृत्यांगना
------------------------------------------
कला क्षेत्रात आमची ओळख निर्माण झाल्याने दुसरा व्यवसाय करताना मर्यादा येत आहेत. आमच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी निर्मात्यांनी खूप सहकार्य केले. यावर्षी तरी आम्हाला आशा होती की आमच्या हाताला काम मिळेल, पण तसे झाले नाही. त्यामुळे ओपन शो लवकर सुरू होऊ दे हीच आमची इच्छा आहे. आम्ही लोकमत सखी मंचचे तीन महिने कार्यक्रम करीत होतो. तेव्हाच लॉकडाऊन जाहीर झाले आणि नंतरचे कार्यक्रम रद्द झाले; पण जेवढे कार्यक्रम केले त्यातून जे पैसे मिळाले त्या पैशांवर आम्ही काही महिने जगलो.
- संगीता लाखे, नृत्यांगना
-------------------------------------
कोरोना काळात हाताला काम नसल्यामुळे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय केला. मात्र, पोलिसांच्या त्रासामुळे तो देखील बंद करावा लागला. आम्ही कलेशिवाय दुसरे काहीच करू शकत नाही.
- स्वाती शिंदे, लोकगायिका
---------------------------------
आमचं कुटुंब आमच्यावर अवलंबून आहे. आमच्याच हाताला काम नसले तर त्यांना आम्ही काय खायला घालणार? कलाकारांच्या हाताला पुन्हा काम मिळू दे.
- अर्चना जवळीकर, प्रसिद्ध नृत्यांगना
---------------------------
लॉकडाऊन काळात पार्लरचे काम करीत होते; पण ते बंद झाले. आम्हाला जे पैसे दिवसाला मिळत होते ते आज महिन्याला मिळत आहेत. ते देखील वेळेवर मिळतीलच असे नाही.
- प्राची शिंदे, नृत्यांगना
-----------------------------------------