कर्वेनगर/वारजे : अनेक वर्षे रखडलेल्या कर्वेनगरच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. १५ जूनपर्यंत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करणार असल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, वृषाली चौधरी, मंजूश्री खर्डेकर, शिवराम मेंगडे, संदीप खर्डेकर, महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आयुक्तांनी या उड्डाणपुलाची पाहणी केली. याशिवाय कर्वेनगर व वारजे परिसरातील विविध विकासकामांचीही पाहणी त्यांनी या वेळी केली. तसेच नागरिकांशी चर्चाही केली. या नियोजित उड्डाणपुलाचे २०१२ मध्ये अजित पवार यांनी उद्घाटन केले होते. मात्र काम अत्यंत संथ गतीने सुरू होते. पर्यायी रस्ता नसल्याने याचा परिणाम येथील वाहतुकीवर होत होता. नित्याच्या वाहतूककोंडीने वाहनचालक हैराण झाले होते. एक्स आकाराचा हा उड्डाणपूल असून, दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना पुलाचा मधील भाग सामाईक राहणार आहे. उड्डाणपुलाचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करून कोंडी सोडवू. यासह वारजे जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण करून १५ मेपासून नव्या टाकीतून या भागातील नागरिकांना अधिक दाबाने पाणीपुरवठा करू.- कुणाल कुमार,आयुक्त, महापालिका
१५ जूनपर्यंत उड्डाणपूल खुला करणार : आयुक्त
By admin | Published: April 10, 2017 2:42 AM