पुणे : महापालिकेच्या येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय लांडगे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उघड केली जाणार आहे. तब्बल महिन्याभरापासून पडून असलेल्या एसीबीच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत पालिका आयुक्तांनी ही चौकशी करण्यास परवानगी दिली आहे. लांडगे यांची पुणे आणि नाशिकमध्ये कोट्यवधींची मालमत्ता असल्याचा दावा तक्रारदार यांंनी एसीबीकडे केलेल्या तक्रारीमध्ये केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या ज्योती राम परिहार यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये एसीबीकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. लांडगे यांच्या पुण्यातील बाणेर, निगडी, मांजरी, कल्याणीनगर आणि नाशिक येथील मालमत्तांची माहिती तसेच त्यांच्याशी संबंधित विम्याची कागदपत्रे, बँकांचे स्टेटमेंट आदी कागदपत्रे एसीबीला सादर करण्यात आली. एसीबीने ही कागदपत्रे दाखल करुन घेत त्याचा अहवाल तयार करुन एसीबीच्या पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये पाठविला.
====
२० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचा दावा
लांडगे यांच्या बाणेर, निगडी, कल्याणीनगर, मांजरीसह नाशिकमध्ये मालमत्ता आहेत. तसेच विमा, बँक आदी कागदपत्रांवरून ही मालमत्ता २० कोटींपेक्षा अधिक असल्याचा आमचा दावा आहे. याबाबत एसीबीकडे आम्ही तक्रार केली होती. त्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.
- ज्योती राम परिहार, संस्थापक अध्यक्षा, मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रतिष्ठान
====
लांडगे यांनी आरोप फेटाळले
लोकप्रतिनिधींमधील वादाची पार्श्वभूमी या तक्रारीला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. माझ्या अधिकारात नसलेली कारवाई करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत होता. याबाबत मी प्रशासनाला आणि वरिष्ठांना लेखी म्हणणे कळविले आहे. याबाबत कायदेशीर मतही मागविण्यात आले होते. मालमत्तेची चौकशी करण्याबाबतच्या तक्रारी केवळ मानसिक त्रास देण्यासाठी केल्या जात आहेत. ज्यामध्ये अजिबात तथ्य नाही.
- विजय लांडगे, सहायक आयुक्त, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय