पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयातील सुमारे ४० अधिकारी कोणत्या ना कोणत्या प्रकरणामध्ये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)च्या सापळ्यात अडकले आहेत.त्याची गंभीर दखल घेत या सर्वच सर्व अधिकाऱ्यांची खुली चौकशी करण्यासंबंधी राज्याच्या शिक्षण आयुक्त सुरज मांढरेंनी एसीबीला पत्र दिले आहे. आयुक्तांच्या या कठोर पवित्र्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सरकारी कार्यालय, पोलिस विभाग याप्रमाणेच शिक्षण क्षेत्रालाही भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. अनेकदा शिक्षक, शिक्षणाधिकारी यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. मात्र, या सर्व लाचखोरांची कसून चौकशी करण्याकरिता अनेकदा एसीबाला अडचणी येतात. त्यामुळे चौकशीअभावी शिक्षक अन् शिक्षणाधिकारी पुन्हा काहीच न घडल्यासारखे सेवेत रुजू होतात आणि पुन्हा भ्रष्टाचार करतात. त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळेच शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ‘त्या’ सर्वांची खुली चौकशी व्हावी, असे पत्र दिले आहे. मांढरे यांच्याकडून जवळपास राज्यातील सर्वच परिक्षेत्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षकांना पत्रे गेलेली आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
राज्यातील शिक्षण विभागातील ४० अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहे. या अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी आल्या आहेत. तसेच त्यांच्या कामकाजासंदर्भातदेखील प्रश्न उपस्थित झालाआहे. या अधिकाऱ्यांची चौकशी करताना अनेकदा साक्षीदार किंवा फिर्यादी फितूर होतात. त्यामुळे चौकशी झाली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची उघड चौकशी करण्यासंबंधी पत्र दिले आहे.
- सुरज मांढरे, राज्याचे शिक्षण आयुक्त