आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर पुणे-आळंदी रस्त्यावरील देहूफाटा - वाय जंक्शन ते चाकण चौक परिसरात वेश्याव्यवसाय मोठ्या जोमाने फैलावत आहे. मात्र, अशा प्रकारांमुळे स्थानिक सर्वसामान्य महिला, तसेच विद्यार्थी मुलींना उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आळंदीकरांकडून केली जात आहे. दरम्यान, सोमवारी (दि.९) सायंकाळी दहा ते पंधरा वेश्याव्यवसाय काढणाऱ्या महिलांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
आळंदी - देवाची येथील पुणे - आळंदी रस्त्यावरील देहूफाटा परिसरात विशेषताः विश्रामगृह ते वाय जंक्शन परिसरात सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत अनेक महिला तोंडाला स्कार्फ बांधून रस्त्यावरून येणाऱ्या - जाणाऱ्यांना हात करून इशारे करत आहेत. संबंधित महिला नियमितपणे या रस्त्यावर फिरत असून देहविक्री व्यवसाय करत आहेत. वास्तविक अशा महिलांच्या वागणुकीमुळे इतर सर्वसामान्य महिला ज्या कामानिमित्त बाहेर जातात त्यांनाही उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे.
चाकण चौक येथील नवीन पूल ते देहूफाटा, जुना पुलालगत भागेश्वरी धर्मशाळेसमोरील फुटपाथ, देहूफाटा बसथांबा, विश्रामगृहासमोर, काळे कॉलनीसमोर तसेच चाकण चौक परिसरातील मुख्य रस्त्यांवर या देहविक्री करणाऱ्या महिला सातत्याने फिरत आहे. मात्र, अशा प्रकारामुळे आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राचे नाव खराब होत आहे. तर, स्थानिक महिला व मुलींना कामानिमित्त रस्त्यावर येणेही जिकिरीचे झाले आहे. वेश्या समजून स्थानिक महिलांकडे व मुलींकडे ग्राहक विचारणा करत असल्याचे प्रकार घडले असून त्यातून वाद उद्भवल्याची सत्यस्थिती आहे. शहरातील सार्वजनिक हित लक्षात घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली आहे.
आळंदी शहर परिसरात, तसेच दिघी हद्दीत सायंकाळनंतर रात्रीच्या चांदण्यात हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय बहरू लागला आहे. संबंधित विविध लॉजिंगच्या दर्शनीबाजूला सन्नाटा दिसून येत असला, तरी पडद्याआड खुल्लमखुल्ला इष्काचा बाजार भरत आहे. आर्थिकद़ृष्ट्या कमजोर, असहाय्य युवतींचा गैरफायदा घेत त्यांना वाममार्गाला लावण्यात सराईत टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. हप्तेगिरीला सोकावलेल्या स्थानिक यंत्रणांकडून टोळ्यांची पाठराखण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.