नारायणगाव : नारायणगाव बाह्यवळणाची उर्वरित कामे जून अखेर पूर्ण करून बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रोडवे सोल्युशन या ठेकेदार कंपनीला दिल्या.
दरम्यान, बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने नारायणगाव शहरातील वाहतूककोंडी दूर होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार शरद सोनवणे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले यांनी नारायणगाव बाह्यवळण कामाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी सरपंच बाबू पाटे, संतोष दांगट, रोडवे सोल्युशन कंपनीचे व्यवस्थापक संतोष घोलप, सागर काजळे, रामदास बाळसराफ, आरिफ आतार, संतोष पाटे, गणेश पाटे, राजेश बाप्ते, दिलीप वाजगे, अभय वाव्हळ, अनिल खैरे, जालिंदर खैरे, विकास तोडकरी, सचिन शेलोत उपस्थित होते.
भेटीवेळी बायपासच्या मोठ्या पुलावरील विद्युत खांब बसविण्याचे काम बाकी असून सद्यस्थितीत रस्ता सुरू केल्यास विद्युत खांब बसविण्याच्या कामासाठी पुन्हा रस्ता बंद करावा लागेल, ही अडचण ठेकेदाराने मांडली. त्यावर सर्व कामे तत्काळ पूर्ण करून महिनाभरात रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना आढळराव पाटील यांनी रोडवे सोल्युशन या ठेकेदार कंपनीला दिल्या. तसेच आळेफाट्याच्या दिशेला बाह्यवळण मार्ग संपतो तिथे भविष्यात अपघातांची शक्यता लक्षात घेऊन कामामध्ये काही दुरुस्त्या सुचविल्या. याशिवाय बायपासला लागून असलेल्या खोडद-हिवरे तर्फे नारायणगाव हद्दीमध्ये उड्डाणपूल व्हावा यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही माजी खासदार आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
आढळराव पाटील म्हणाले की, खेड-सिन्नर महामार्गावरील १३८ किमी लांबीच्या १३४८ कोटी रुपयांच्या प्रकल्पापैकी १०९ किमी महामार्गाचे चौपदरीकरण पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्यात आले. मात्र बाह्यवळण मार्गाच्या कामामध्ये अडथळे आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा करून रस्त्यावरील बाह्यवळण मार्गाची स्वतंत्र निविदा काढण्यास सरकारला भाग पाडले. ऑक्टोबर २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिलेल्या बाह्यवळण कामांपैकी नारायणगाव बायपास व खेड घाट या कामांची फेब्रुवारी २०१९ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून ८ मार्च २०१९ रोजी म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्याच्या २ दिवस आधी रोडवे सोल्युशन या कंपनीला ७२ कोटींना हे काम निश्चित होऊन कामाचे इरादा पत्र देण्यात आले. त्यानंतर लोकसभेची आचार संहिता जाहीर झाल्याने जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये कामाला सुरुवात झाली. त्यामुळेच आता या ९.५० किमी लांबीच्या नारायणगाव बाह्यवळणाचे व खेड घाटाचे काम आता पूर्ण होताना दिसत आहे.
१३ नारायणगाव
नारायणगाव बाह्यवळण रस्त्याच्या कामाला भेट देऊन आढावा घेताना शिवाजीराव आढळराव पाटील, शरद सोनवणे, माऊली खंडागळे, सुनील बाणखेले, बाबू पाटे व इतर.