ग्राहकांची फसवणूक : मिठाई विक्रेत्यांकडून नियमाची पायमल्ली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आमच्याकडे रोजच ताजीच मिठाई येते...आम्ही वैधता दिनांक (एक्स्पायरी डेट) संपलेली मिठाई ठेवतच नाही...असे सांगत शहरातील बहुतेक मिठाई विक्रेते ‘एक्स्पायरी डेट’चा नियम धाब्यावर बसवत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत निदर्शनास आले.
मिठाई विक्रेत्यांकडून सर्वसामान्य नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी खुली मिठाई विकताना विक्रेत्यांनी मिठाईसमोर तिच्या ‘एक्स्पायरी डेट’चे फलक लावणे बंधनकारक केले आहे. राज्यात ऑक्टोबर पासून या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने शहरातील मिठाई विक्रेत्यांना दिले होते. परंतु आजही बहुतेक मिठाई दुकानदारांकडून या नियमाचे पालन होताना दिसत नाही.
शहरातील पेठांसह उपनगरातील बहुतेक सर्वच लहान-मोठ्या मिठाई दुकानदारांकडून ‘एक्सपायरी डेट’चा नियम धाब्यावर बसवला जात आहे. सणासुदीसह इतरही वेळेस दुधापासून केलेल्या तसेच अन्य मिठाईला मोठी मागणी असते. शिळी किंवा भेसळयुक्त पदार्थांची मिठाई खाल्याने अनेकदा विषबाधेच्या घटना घडतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा मानके प्राधिकरणाच्या आदेशानंतर अन्न व औषध प्रशासनाने खुल्या स्वरुपातील मिठाई विक्री करताना मिठाईच्या ‘ट्रे’जवळ त्याची वैधता तारीख लिहिणे बंधनकारक केले आहे. ऑक्टोबरपासून हे नियम अंमलात आले असतानाही मिठाई विक्रेत्यांकडून या नियमांचे पालन होताना दिसत नाही.
चौकट
एकाही दुकानात ‘एक्स्पायरी डेट’ नाही
“आमच्या घराच्या परिसरात चार-पाच मिठाईची दुकाने आहेत. परंतु एकाही मिठाई दुकानात अशी वैधता तारीख लावली जात नाही. मिठाई घ्यायला गेल्यावर ‘मिठाई ताजी आहे. पुढील चार-पाच दिवस चालेल,’ असे विक्रेत्यांकडून सांगितले जाते.”
सुचिता ढोमसे, सिंहगड रस्ता
चौकट
कडक कारवाई करणार
“शासनाच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिन्यांपासून खुली मिठाई विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना सर्व प्रकारच्या मिठाईवर ‘एक्स्पायरी डेट’ लावणे बंधनकारक केले आहे. याचे पालन न करणाऱ्या मिठाई विक्रेत्यांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करु.”
- शिवाजी देसाई, सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग