बिबवेवाडी : येथील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकरनगर झोपडपट्टीला गेल्या महिन्यातील २१ तारखेला आग लागून ७४ कुटुंबांची घरे जळून खाक झाली होती. या दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे. तरीदेखील येथील जळीतग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यांचा संसार अजूनही उघड्यावरच आहे. त्यामुळे या कुटुंबीयांमध्ये नाराजीचा सूर आहे.दुर्घटना झाल्यानंतर, प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले व त्यानंतर प्रशासनाने जळीतग्रस्त कुटुंबाना लाकडी वासे व पत्रे देऊ केले; परंतु जळीतग्रस्त कुटुंबांनी पक्क्या घराची मागणी करत ही मदत नाकारली.दुर्घटनेनंतर अनेक सेवाभावी संस्थांनी जळीतग्रस्त कुटुंबांना संसारपयोगी वस्तूंचे वाटप केले. काही संस्थांनी धान्य दिले, तर काही संस्थांनी ताट-वाट्या, गॅसची शेगडी व कपडे ठेवण्यासाठी लोखंडी ट्रंक दिल्या. काही राजकीय पक्ष, राजकीय संघटने तर्फे रोख रक्कमही देण्यात आली.पण, हे सर्व सामान मिळत असताना हे सामान ठेवण्यासाठी हक्काचे घर नसल्यामुळे आलेल्या वस्तूं ठेवायच्या कुठे, हा प्रश्न निर्माण होत आहे. दुर्घटनाग्रस्त घरांचे आता सांगाडेही शिल्लक राहिलेले नसून फक्त घरांचे जोते शिल्लक राहिले आहेत. त्यावरच कुठे चादरीने, तर कुठे फ्लेक्स बांधून छप्पर करून त्याखाली जळीतग्रस्त कुटुंब आपला संसार करत आहेत.पावसाळ्यात काय करायचे ?उन्हाळ्याचे दिवस असून, दुर्घटनाग्रस्त कुटुंब विजेविना राहत असून, थोड्याच दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे डोक्यावर छप्पर नसल्याने पावसाळ्याच्या दिवसांत काय करायचे, हा प्रश्न या कुटुंबीयांना भेडसावत आहे. चादरीचे छत अन् काळ्या भिंतीदोनमजली घरात राहणारे अशोक सूर्यवंशी यांचे ८ लोकांचे कुटुंब असून, ते फळांच्या गाळ्यावर हमालीचे काम करतात, तर त्यांचे वडील बांबूपासून कुल्फीला लागणाऱ्या काड्या बनविण्याचे काम करतात. कमी जागेत त्यांनी त्यांचा संसार थाटला होता; परंतु त्याची जागा आता काळ्या ठिक्कर पडलेल्या भिंतींनी घेतली आहे. छताची जागा आता चादरीने व फ्लेक्सने घेतली आहे. शासनाकडून अद्याप पर्यंत कुठलीही मदत मिळाली नाही याची त्यांना खंत आहे.अनेकजण फोटोसाठी येतातमंगलकुमार खडके या जळीतग्रस्त कुटुंबातील जेष्ठ महिला. घराच्या वरती बांधलेल्या फ्लेक्सच्या सावलीखाली अख्खा दिवस घालवतात. घरातील पुरुष मंडळी दिवसभर कामावर जातात. प्रशासनाने पक्की घरे बांधून द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सेवाभावी संस्थानी केलेली मदत त्या आर्वजून सांगत होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र सेवाभावी संस्था मदत करताना फोटो काढण्यापुरते येतात, असे सांगितले.जळीतग्रस्त कुटुंबातील बहुतेक सदस्य दिवसभर कामावर असतात. यामध्ये काही महिला वर्ग धुणीभांडी करण्याचे काम करत असल्यामुळे त्यांचा दिवस निघून जातो; परंतु संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर मात्र वस्तीतील समाजमंदिराचा आश्रय घ्यावा लागतो. घरातील वयोवृद्ध पुरूष व महिला उन्हामुळे एकमेकांच्या घराच्या सावलीचा आश्रय घेतात. दरम्यान, रमजानचा पवित्र महिना चालू असताना अनेक जळीतग्रस्त कुटुंब आपल्या नातेवाइकांकडे तसेच तिथेच असलेल्या मस्जिदमध्ये राहत असून उपवास करत आहे.
त्यांचा संसार उघड्यावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 6:53 AM