पुणे: साहित्यिक, नाटककार, संगीतकार, अभिनेता, वक्ता एवढीच केवळ पुलंची ओळख सीमित नव्हती तर त्यांचं सामाजिक दातृत्व देखील तितकचं वाखाणण्याजोग होतं. आपल्या संवेदनशील वृत्तीतून समाज जीवनाशी बांधिलकी जपणारे महाराष्ट्राचे लाडके पुलं आणि सुनीताबाई देशपांडे यांनी सामाजिक कामासाठी दिलेल्या योगदानाबददल मान्यवरांनी या दोघांविषयी प्रेमाची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. निमित्त होते आयुकातर्फे आयोजित पुलस्त्य महोत्सवाचे... या कार्यक्रमात पुलं आणि सुनीताबाईंनी केलेल्या सामाजिक कार्याचे पैलू उलगडण्यात आले. आयुकाचे संस्थापक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, मुक्तांगणच्या मुक्ता पुणतांबेकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, सुनीताबाईंचे बंधू सर्वोत्तम ठाकूर, भारतीय विद्या भवनचे नंदकुमार काकिर्डे यांनी पुलं आणि सुनीताबाईंच्या आठवणींना उजाळा दिला. ‘पुलं आणि सुनीताबाई डॉ. अनिल अवचट यांचे व्यसनाधिनेविषयीचे लेख वाचून अस्वस्थ झाले. त्यांनी या संदर्भात काय करता येईल असे विचारले. त्यातून व्यसनमुक्ती केंद्राची कल्पना पुढे आली आणि त्यांनी त्यासाठी एक लाखाची देणगी दिली. त्या देणगीच्या जोरावर मुक्तांगणची वाटचाल सुरू झाली. व्यसनमुक्ती केंद्रात तयार झालेल्या आकाशकंदिलातील एक कंदिल दिवाळीच्या आधी पुलंच्या घरी लावला जायचा, अशी आठवण मुक्ता पुणतांबेकर यांनी सांगितली. आशय फिल्म क्लबच्या स्थापनेपासून पुलं आणि सुनीताबाई सोबत होते. चित्रपट दाखवण्यासाठी प्रोजेक्टर घेण्यासाठी देणगी दिली. मात्र, देणगीची रक्कम लगेच देता येणार नसल्याने त्यांनी आधी पत्र दिले आणि देणगीची रक्कम सव्याज दिली, असा किस्सा जकातदार यांनी सांगितला. माझ्या लहानपणी बनारसमध्ये राहात असताना पुलं आमच्या घरी आल्याची आठवण सांगून पुढे त्यांच्याशी असलेल्या ओळखीचे ऋणानुबंधात रुपांतर झाले, असे डॉ. नारळीकर म्हणाले. अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानप्रसार आणि विवेकवादी विचारांसाठी पुलंनी केलेले काम महत्त्वाचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तर स्वत:ची वास्तू विकून मुक्तांगण विज्ञानशोधिका उभारण्यासाठी सुनीताबाईंनी २५ लाखांचा निधी दिल्याची आठवण काकिर्डे यांनी नमूद केली. शरीरविक्रय करणाºया मुलींच्या पुनर्वसनाच्या प्रकल्पासाठी पुलं आणि सुनीताबाईंनी आर्थिक मदत केली होती. पुढे आणीबाणीनंतरच्या निवडणुकीवेळी अन्यायाविरोधात जागृती करण्यासाठी पुलं जनआंदोलनात उतरले. शनिवारवाड्यावरील त्यांच्या सभेसाठी अफाट गर्दी झाली होती. त्यांची ती प्रतिमा आजही मनात आहे, अशी भावना चाफेकर यांनी व्यक्त केली. ------------------------------------------------------
पुलं आणि सुनिताबाईंचे उलगडले सामाजिक पैलू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 8:57 PM
साहित्यिक, नाटककार, संगीतकार, अभिनेता, वक्ता एवढीच केवळ पुलंची ओळख सीमित नव्हती...
ठळक मुद्दे निमित्त होते आयुकातर्फे आयोजित पुलस्त्य महोत्सवाचे...अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानप्रसार आणि विवेकवादी विचारांसाठी पुलंनी केलेले काम महत्त्वाचे