पिंपरी : उद्योगनगरीच्या सांस्कृतिक चळवळीचा मानदंड ठरणाऱ्या ‘नाट्य महोत्सव -२०१५’चा शानदार उद्घाटन सोहळा बुधवारी सायंकाळी साडेपाचला होणार आहे. लोकमत वृत्तपत्रसमूह आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने प्रथमच महोत्सवाचे आयोजन केले आहे.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात १३ जूनपर्यंत रंगभूमीवरील चार विविध व्यावसायिक, प्रायोगिक नाट्यप्रयोग पाहण्याची संधी शहरवासीयांना मिळणार आहे. नाट्यरसिकांसाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे. नाट्य महोत्सवाचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने शहरातील नाट्यक्षेत्रात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. नाट्यक्षेत्रातील मान्यवर दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. तिकीट विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाचला होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाट्य, चित्रपट कलावंत मोहन जोशी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर जोशी यांची प्रकट मुलाखत प्रसिद्ध निवेदक राजेश दामले घेणार आहेत. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, नाट्य परिषदेचे सहकार्यवाह भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष राजेशकुमार सांकला, उद्योजक आर. डी. देशपांडे, क्रेडाईचे उपाध्यक्ष अनिल फरांदे, उद्योजिका जयश्री फडणवीस, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, महाव्यवस्थापक मिलन दर्डा उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आनंद म्हसवेकर दिग्दर्शित ‘मदर्स डे’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. त्यात सुहिता थत्ते, सुप्रिया पाठारे, स्मिता सरवदे, पौर्णिमा तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यानंतर पुढील तीन दिवस दररोज सायंकाळी साडेपाचला नाट्यप्रयोग होतील. ११ जूनला सादर होणाऱ्या संतोष रासने दिग्दर्शित ‘सवत तुझी लाडकी ग’ या नाटकात संतोष रासने, देवेंद्र भिडे, सोनाली, नितीन धायकर, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १२ जूनला सादर होणाऱ्या कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘त्या तिघांची गोष्ट’ या नाटकात शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, जयंत घाटे, सुचेत गवई, ज्ञानदा पानसे यांच्या, तर १३ जूनला होणाऱ्या देवेंद्र पेम दिग्दर्शित ‘आॅल दि बेस्ट २’ या नाटकात मयूरेश पेम, अभिजित पवार, सनी मुनगेकर, खशबू तावडे यांच्या भूमिका आहेत. (प्रतिनिधी)शानदार सोहळा आजशहरातील विविध केंद्रांवर प्रवेशिका उपलब्ध आहेत. सादर होणाऱ्या चारही नाटकांसाठी एकूण प्रवेशमूल्य १२०० रुपये असून, महोत्सवानिमित्त ‘लोकमत’ने रसिकांसाठी खास सवलत योजना राबविली आहे. ही चारही तिकिटे केवळ ३०० रुपयांत मिळणार आहेत. नाट्य महोत्सवाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन लोकमत परिवाराने केले आहे. या उपक्रमाचे सहप्रायोजक फरांदे स्पेसेस आणि आऊटडोअर पाटर्नर बिग इंडिया ग्रुप आहे.
नाट्य महोत्सवाचा चिंचवडला उद्घाटन सोहळा आज
By admin | Published: June 10, 2015 5:09 AM