पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ‘आॅपरेशन क्लीनअप’ सुरू केले आहे. मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. येत्या दोन महिन्यांत या कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार आहेत.गेल्या काही महिन्यांत तब्बल १९ गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले. ८ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काची कारवाई करण्यात आली असून, ५९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी १७ टोळ्यांवर कारवाई करीत, १४२ गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले होते. ११० गुन्हेगार शहर आणि जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यात आले आहेत. स्थानबद्धतेची कारवाई केलेल्या गुन्हेगारांना, तर राज्यातल्या विविध कारागृहांमध्ये पाठविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची रसदच बंद होत आहे. तडीपारीच्या कारवायांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेग आला असून, या महिन्यात बारापेक्षा अधिक गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये आॅपरेशन क्लीनअप राबविणार असल्याचे सह आयुक्त सुनील रामानंद यांनी सांगितले. चारही परिमंडलांच्या उपायुक्तांकडून त्यांच्या हद्दीतील सराईत आणि घातक गुन्हेगारांची यादी मागवण्यात आली आहे. या गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सध्या सुरू असून तडीपारी आणि स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येणार आहे. हा आकडा साधारणपणे ३०० पेक्षा अधिक असल्याची माहिती मिळाली आहे. स्वत: पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सह आयुक्त सुनील रामानंद त्याचा आढावा घेणार आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीखोर, लँडमाफिया आणि गुन्हेगारांचे मनुष्यबळ पुरवणारे गुंड यांच्यावर लक्ष राहणार आहे. माळवदकर-आंदेकर या दोन टोळ्यांमधील वैमनस्यातून टोळीयुद्धाचा भडका पुण्यात उडाला होता. हे टोळी युद्ध थंडावताच काही काळ शांत झालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले होते. (प्रतिनिधी)
गुन्हेगारीमुक्तीसाठी ‘आॅपरेशन क्लीनअप’
By admin | Published: November 18, 2016 6:34 AM