विरोधकांचा प्रचार जोरदार तर पुणे शहर काँग्रेसमध्ये एकमेकांची जिरवण्याचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:26 AM2024-04-24T10:26:16+5:302024-04-24T10:28:00+5:30

काँग्रेस भवनात थोर पुरुषांची जयंती साजरी करण्याची काँग्रेसची परंपरा आहे...

Opponents are campaigning strongly and in Pune City Congress, the politics of killing each other | विरोधकांचा प्रचार जोरदार तर पुणे शहर काँग्रेसमध्ये एकमेकांची जिरवण्याचे राजकारण

विरोधकांचा प्रचार जोरदार तर पुणे शहर काँग्रेसमध्ये एकमेकांची जिरवण्याचे राजकारण

पुणे : देशभक्त केशवराव जेधे यांच्या जयंतीला त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यावरून काँग्रेस भवनमध्ये प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी कान्होजी जेधे यांनी आरोप केले. प्रचार समन्वयक अरविंद शिंदे यांना प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहणे शक्य नाही, असे म्हणत काँग्रेसच्या कसबा ब्लॉकचे अध्यक्ष अक्षय माने यांनी शिंदे यांचा बचाव केला. त्यावेळी उपस्थित प्रचार प्रमुखांनी हे करणे आवश्यक होते असे म्हटले आहे.

त्याचबरोबर कान्होजी जेधे यांनी याबाबत प्रसिद्धी माध्यमांकडे तक्रार करून पक्षशिस्तीचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसकडे करत असल्याचेही माने यांनी नमूद केले आहे. यावरून ऐन निवडणुकीत शहर काँग्रेसमध्ये परस्परांची जिरवण्याचेच राजकारण सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेस भवनात थोर पुरुषांची जयंती साजरी करण्याची काँग्रेसची परंपरा आहे. केशवराव जेधे यांच्या प्रयत्नांमधूनच काँग्रेस भवनची वास्तू उभी राहिली. त्यांच्याच जयंतीचा शहर काँग्रेसला विसर पडला, अशी टीका केशवराव जेधे यांचे पणतू कान्होजी जेधे यांनी केली होती. प्रत्युत्तरादाखल माने यांनी आता त्यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा आरोप केला आहे.

शहर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार सुरू असतानाच शहर काँग्रेसमध्ये आरोप सत्र सुरू आहे. प्रचारासाठी वेगवेगळ्या समित्यांमध्ये नियुक्ती करण्यावरून सुप्त टीकाटिपणी सुरू असताना आता जेधे व माने यांच्या माध्यमातून टिकेच्या उघड फैरी झाडण्यास सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Opponents are campaigning strongly and in Pune City Congress, the politics of killing each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.