पुणे: आई आणि बहिणीचे प्रेम कशानेही विकत घेता येत नाही, हे विरोधकांना कळत नाही. कर्नाटक, तेलंगणात विरोधकांनी योजना सुरू केली. बंद झाली. आमच्या शिवराज चव्हाण यांनी मध्य प्रदेशात सुरू केलेली योजना अजून चालू आहे. विरोधक सत्तेवर आले तर आधीच्या योजना बंद करतात हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे पुढे वेगळा परिणाम आला तर योजना बंद होतील, अशी भीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा अधिकृत शुभारंभ शनिवारी बालेवाडी क्रीडा संकुलात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते.
‘ते वसुली सरकार होते, आम्ही देणारे आहोत’देवेंद्र फडणवीस म्हणाले, की हे ‘देना’ सरकार आहे, ‘लेना’ सरकार नाही. मागचे सरकार वसुली सरकार होते. आम्ही देणारे आहोत.पूर्वीच्या योजना दलालीच्या होत्या. आमच्या महायुती सरकारने आणलेल्या योजना या फसव्या नसून पूर्णपणे पारदर्शी आहेत. योजनेत कसलीही दलाली नाही, आधार बँक खात्याला लिंक असेल तर थेट लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होतात, इतकी सुटसुटीत पद्धत पंतप्रधान मोदी यांनी सुरू केली आहे.
भावांनाही वीजमाफी केली : अजित पवारउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पुढची ५ वर्षे योजना सुरू ठेवायची तर आगामी निवडणुकीत आमची निवडणूक चिन्हे विसरू नका,’ असे आवाहन केले. यात कसलेही राजकारण नाही, खरे तेच बोलतो, असेही ते म्हणाले. आजपर्यंतच्या राजकीय जीवनातील हा सर्वांत मोठा दिवस आहे, विरोधक कारण नसताना टीका करतात. भावांनाही वीजमाफी केली. दुधाचा दर वाढवून दिला, तरीही टीका होते. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. आम्ही कामाची माणसे आहोत. असे पवार म्हणाले.मंत्री अदिती तटकरे यांनी फक्त ४ दिवसात १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा करण्यात आल्याचे सांगून नोंदणीची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढविल्याचे सांगितले. सरकारने या योजनेसाठी तयार केलेल्या जाहिरातींचेही सादरीकरण यावेळी करण्यात आले. तत्पूर्वी गायक अवधूत गुप्ते व गायिका वैशाली गुप्ते यांचा गाण्याचा कार्यक्रम पार पडला.