- लोकमत न्यूज नेटवर्कखळद : पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होत असलेल्या मेमाणे-पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या गावांमध्ये काल पीक पाहणीच्या नावाखाली सुरू असलेल्या प्राथिमक सर्व्हेला संबंधित सर्वच गावांतील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करीत सर्व्हेसाठी आलेल्या महसूल विभागाच्या कर्मचऱ्यांना परत पाठविले. यापुढेही अशा प्रकारचा कसलाही सर्व्हे होऊ देणार नसल्याची माहिती खानवडीचे ग्रामपंचायत सदस्य तथा बाधित शेतकरी रमेश बोरावके यांनी दिली. पीकपाहणीचा सर्व्हे शक्यतो नोव्हेंबर महिन्यात असल्याने सध्या उन्हाळ्यात कोणत्या पिकांचा व कशासाठी सर्व्हे करत आहेत, याबाबत संबंधित ग्रामस्थांनी विचारणा करून हा सर्व्हे करू नका, असे सांगून त्यांना परत पाठविले. पुढील दोन दिवसांत पुन्हा अशा प्रकारे सर्व्हे करण्यासाठी संबंधित विभागाचे कर्मचारी येणार असून त्यांना सर्व्हे करू द्यायचा नाही, असेही ग्रामस्थांनी ठरविले आहे. अचानक अशा प्रकारचा सर्व्हे सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित होत आहेत. आम्हाला विमानतळाला जमीन द्यायची नाही, तरीही शासन अशा प्रकारे दांडगाई करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचे बोरावके यांनी सांगितले. या सर्व्हेमध्ये जुन्या, नवीन घरांची, गोठ्यांची, जनावरे, पशु-पक्षी यांची मोजणी करण्यात येत होती. मात्र शेतकऱ्यांनी या सर्व्हेला विरोध करून त्यांना परत पाठविले आहे. आज चिकटविली नोटीसविमानतळबाधित गावातील मुंजवडी येथे महसूल विभागाने नोटीस चिकटविली आहे. त्यामध्ये ‘जमिनीचे रेकॉर्ड संगणकीकृत करण्याचे अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत सर्व खातेदारांच्या सात-बारावरील नावे, क्षेत्र, जलसिंचनाची साधने याबाबत १६ ते २५ मे या कालावधीत अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत खातेदारांनी आपल्या शिवारात उपस्थित राहावे,’ असे नमूद करण्यात आले आहे. शासन हे कशासाठी करत आहे, याबाबत शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.
पीक पाहणी सर्व्हेला शेतकऱ्यांचा विरोध
By admin | Published: May 18, 2017 5:47 AM