फोटोग्राफीसाठी लागणाऱ्या साधनांची चांगली ओळख या क्षेत्रात येणाऱ्यांना हवी आहे. त्यामुळे कॅमेऱ्याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच फोटोग्राफीच्या नियमांचा अभ्यास करणे आणि सिद्धांतांचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. सध्याच्या डिजिटलायझेशनच्या काळामध्ये बऱ्याच तरुण विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत प्रश्न पडतो. फॅशन डिझाइनिंग, इंजिनियरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर त्याचप्रमाणे फोटोग्राफी हा विषय मीडिया अँड इंटरटेन्मेंट या विभागाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे फोटोग्राफरला आजच्या आधुनिक काळामध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
फोटोग्राफर केवळ हौसेकरिता फोटोग्राफी करतो किंवा छंद जोपासण्यासाठी फोटोग्राफी करतो, असे चित्र पूर्वीच्या काळी होते. परंतु, आजच्या आधुनिकीकरणामध्ये फोटोग्राफर हा आव्हानात्मक आणि कामाचा मोबदला मिळवून देणारे रोजगारक्षम क्षेत्र बनलेले आहे. यासाठी फोटोग्राफीच्या कौशल्यांची व ज्ञानाची माहिती घेणे हे खूप गरजेचे आहे. करिअरच्या दृष्टीने फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, सिनेमॅटोग्राफर, डायरेक्टर आॅफ फोटोग्राफर इत्यादी मीडियाशी संबंधित क्षेत्र प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूप फायद्याचे आहे. तसेच फोटोग्राफरसारखा चांगला स्वयंउद्योग नाही, असेच म्हणता येईल.
अलीकडच्या काळात नोकरी मिळत नसल्यामुळे तसेच आवड असल्यामुळे बहुतांशी तरुण फोटोग्राफीकडे वळू लागले आहेत. फोटोग्राफीचे विविध विभाग तरुणांना आकर्षून घेत आहेत. परंतु, फोटोग्राफर बनणे तेवढे सोपे नाही. फोटोग्राफर क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत व समर्पण वृत्ती लागते.
गेली वीस वर्षे फोटोग्राफी विषयाचे प्रशिक्षण देत असल्यामुळे या क्षेत्रातील बदलत्या फोटोग्राफीचे बेसिक ते सध्याचे डिजिटल मिररलेस कॅमेरा यांचे युग अनुभवता आले. त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिक व रोजगाराच्या संधीही बदल्याचे दिसून येते. मात्र, प्रकाश आणि फोटोग्राफीचे बेसिक तंत्र कायम तेच राहणार आहे. जेव्हा हे बेसिक विद्यार्थी समजून घेतील तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारचा कॅमेरा वापरल्यास त्यांना उत्कृष्ट रिजल्ट मिळेल. याबाबतचे प्रशिक्षण शासकीय संस्थेमधून पूर्ण केल्यास विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र शासनातील विविध पदांवर नोकरी मिळवता येते. विद्यार्थ्यांना फोटोग्राफीचे प्रशिक्षण औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिले जाते. तसेच नाशिक येथे मुलींना प्रशिक्षण दिले जाते.