पुणे : देशात भाजपप्रणित एनडीए ने २९२ जागा जिंकल्यानंतर आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भव्य शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधीला महाराष्ट्रातील ६ ते ७ खासदारांची नावे समोर आली आहेत. त्यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. पुण्यातून खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आला होता. महापौर ते खासदार असा प्रवास करणारे मुरलीधर मोहोळ मोदींच्या मंत्रिमंडळात जाणार आहेत. यानिमित्ताने मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबियांसह देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील खासदारांचे कौतुक करत प्रतिक्रिया दिली आहे. मोहोळ आणि खडसे यांच्यासारख्या तरुण खासदारांना संधी देण्यात आली. महाराष्ट्रात अनुभवी लोकांना मंत्री होण्याची संधी मिळालीये. असे त्यांनी सांगितले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे, एमआयएमचे अनिस सुंडके या चार जणांसह ३५ उमेदवार रिंगणात उभे होते. खरी लढत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात झाली. कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या चार विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे १ लाख २३ हजार १६७ मताधिक्याने निवडून आले. सर्वत्र जल्लोष करत मोहोळ यांनी लोकसभेच्या आखाड्यात धंगेकरांना चितपट केले.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar mohol) हे कोथरूड भागात वास्तव्यास आहेत. त्यांनी आरएसएस मधून सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. कोरोनाच्या महामारीत मोहोळ हे पुण्याच्या महापौर पदावर विराजमान झाले होते. त्यांनी त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम केले आहे. तेव्हापासूनच पुणे शहरात त्यांची प्रतिष्ठा वाढली होती. पुणे खासदारपदासाठी भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांची नावे चर्चेत होती. परंतु मोहोळ यांचे काम पाहता त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्यांनी या संधी साधून अखेर खासदारपदी विराजमान होण्याचा मान मिळवला. मुरलीधर मोहोळ यांना पहिल्यांदाच खासदारपद मिळाले आहे. अशातच त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळातून मंत्रिपदाची ऑफर आल्याने पुणेकरांकडून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.
मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक- गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ता- बूथ प्रमुख म्हणून भाजपामध्ये कामाला सुरुवात- युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवपदाचीही संधी- संघटनेत ३० वर्षे कार्यरत- सांस्कृतिक-क्रीडा क्षेत्रातही योगदान- २००२, २००७ आणि २०१७ साली कोथरुडमधून नगरसेवक- २०१७ : साली स्थायी समिती धुरा- २०१९ : पुण्याच्या महापौरपदीसंधी- कोरोना काळात विविध पातळ्यांवर भरीव काम- २०२० : अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी- २०२२ : सरचिटणीस, महाराष्ट्र भाजपा- २०२२ : पश्चिम महाराष्ट्राची भाजपाची जबाबदारी- ४ जून, २०२४ : खासदार, पुणे
महाराष्ट्रातून कोण होणार मंत्री?
मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांची नावे जवळपास निश्चित आहेत तर एका खासदाराबाबत चर्चा सुरु आहेत. भाजपाकडून महाराष्ट्रात निवडून आलेल्यांपैकी माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे. तर रिपाईंचे रामदास आठवले यांनाही पुन्हा राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपाकडून सलग तिसऱ्यांदा खासदार बनलेल्या रावेरच्या रक्षा खडसे यांना आणि पुण्यातून महापौर पदावरून थेट खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आला असल्याची माहिती आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी ७ खासदार निवडून आल्यानंतर, त्यांच्यापैकी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना शपथविधीसाठी फोन आल्याचे सांगितले जात आहे.