पुणे : काँग्रेसच्या प्रदेश समितीवर पुण्यातून पाठविल्या जाणा-या 12 सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, सात वेळा पालिकेवर निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल तसेच निता रजपूत यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार दीप्ती चौधरी यांना यातून वगळण्यात आले आहे तर उर्वरित 9 सदस्य पूर्वीपासून कार्यकारिणीवर आहेत. काँग्रेसचे शहरात १२ ब्लॉक आहेत. त्यातून त्या प्रत्येक ब्लॉकमधून प्रदेश समितीवर प्रत्येकी एक प्रतिनिधी पाठविला जातो. त्या प्रतिनिधींची नावे व ब्लॉक पुढीलप्रमाणे. १ उल्हास पवार (पर्वती), २ अभय छाजेड (मार्केटयार्ड), ३- मोहन जोशी (नेहरू स्टेडियम) ४- बाळासाहेब शिवरकर (हडपसर), ५-शरद रणपिसे (रेल्वे स्टेशन), ६- अरविंद शिंदे (वडगाव शेरी), ७- विश्वजीत कदम (कोथरूड), ८ - रोहित टिळक (कसबा पेठ), ९ - रशीद शेख (कँटोन्मेंट), १० - नीता रजपूत (भवानी पेठ), ११ - कमल व्यवहारे (शिवाजीनगर), १२- आबा बागूल (बोपोडी)गेल्या अनेक वर्षांपासून प्रदेश समितीवर असलेल्या उल्हास पवार, मोहन जोशी, शरद रणपिसे, अभय छाजेड यांनाच पुन्हा संधी देऊन नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना डावलले गेल्याने पक्षात नाराजीची भावना आहे.
प्रदेश प्रतिनिधित्वावरूनही शहर काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदीप्रदेशवर पाठवण्याच्या प्रतिनिधींवरून शहर काँग्रेसमध्ये असंतुष्टांचा वणवा पेटला आहे. निष्ठावंतांना डावलून नेत्यांच्या पुढे पुढे करणा-यांना व पक्षाच्या शहरातील -हासाला जबाबदार असणा-यांना संधी दिल्याची टीका होत आहे. आबा बागूल, निता रजपूत यांना नव्याने घेण्यात आले असल्याचे समजते. तसेच महिलेशी असभ्य वागणूक केल्याप्रकरणी जामिनावर असलेल्यांनाही सामावून घेण्यात आले आहे. आमदार अनंत गाडगीळ यांना तसेच आणखी काही निष्ठावंतांना डावलण्यात आले आहे.