...ही तर भाजपाचा पालिकेतील कारभार चव्हाट्यावर आणण्याची संधी : प्रशांत जगताप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 03:15 PM2021-05-08T15:15:11+5:302021-05-08T15:15:35+5:30
येत्या निवडणुकीत महापालिकेतील सत्ताही ताब्यात घेण्याचा व्यक्त केला निर्धार....
पुणे: मागील साडेचार वर्षातील भारतीय जनता पार्टीचा कारभार चव्हाट्यावर आणण्याची संधीच राष्ट्रवादी काँगेसचा शहराध्यक्ष म्हणून मिळाली आहे, त्यामुळे येत्या निवडणुकीत महापालिकेतील सत्ता ताब्यात घेणारच असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
हिराबाग चौकातील पक्ष कार्यालयात जगताप यांनी मावळते अध्यक्ष आमदार चेतन तूपे यांच्या हस्ते शहराध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली. पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक बाबराव चांदेरे, महिला पदाधिकारी शिल्पा भोसले व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तूपे व उपस्थितांनी जगताप यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना जगताप म्हणाले, भाजपाच्या आधी सलग १० वर्षे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता होती. आम्ही जाहीर केलेल्या कामांचीच उद्घाटने विद्यमान सत्ताधारी भाजपा आत्ता करत आहे." सत्तेच्या काळात त्यांनी त्यांचे म्हणून केलेले एकतरी काम दाखवावे, असे आव्हानच जगताप यांनी दिले.
उपनगरांमध्ये भाजपाचे वर्चस्व आहेच. ३३ गावांचा समावेश त्यांच्याच राज्यातील सत्ताकाळात झाला. आम्ही तिथेच काय, पण शहराच्या मध्यभागातही जोर दाखवू, कारण पुणेकरांचा आता भाजपावर हे तर काहीच कामाचे नाहीत असा रोष आहे. संघटन वाढवणाऱ्यावर भर देणार असून पक्षाचा तळागाळात पाया आहे, तो विस्तारण्याला प्राधान्य असणार आहे. महापालिकेतील प्रमुख विरोधक आहोतच, तरीही कोरोना काळात आमचे त्यांना चांगल्या कामासाठी सहकार्य राहीलच. पण भ्रष्टाचार, लुटालूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा जगताप यांनी दिला.