बारामती : महावितरणने वीजबिल भरण्याच्या वॉलेटद्वारे रोजगाराची संधी निर्माण केली असून वॉलेटद्वारे वीजबिलांचा भरणा केल्यास प्रती पावतीमागे ५ रुपये कमिशन देण्यात येणार आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिकांना सुद्धा या वॉलेटच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळविता येणार आहे.दरम्यान बारामती परिमंडल अंतर्गत सोलापूर, सातारा जिल्ह्यात व बारामती मंडलमधील बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, शिरूर, भोर तालुक्यात ठिकठिकाणी महावितरणच्या वॉलेट नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महावितरणकडून वीजबिलांचा भरणा करण्यासाठी मोबाइल अॅपसह ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतर रोजगाराची नवी संधी निर्माण करीत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने स्वत:चे पेमेंट वॉलेट आणले आहे. वॉलेटद्वारे वीजग्राहकांना स्वत:चे वीजबिल भरता येईल. त्याचप्रमाणे बचत गट, जनरल स्टोअर्स, मेडिकल दुकानदार, किराणा दुकान आदी छोटे-मोठे व्यावसायिक, बचतगट, महावितरणचे वीजबिल वाटप व रीडिंग घेणाऱ्या संस्थांना या वॉलेटद्वारे ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करून उत्पन्न मिळविता येणार आहे. वॉलेट नोंदणीसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहे.
त्यानंतर संबंधित उपविभाग कार्यालयाकडून अर्जदारांच्या अर्जांची व जागेची पडताळणी करण्यात येईल. त्यासाठी कोणतेही शुल्क नाही. वॉलेटधारकाने प्रथम कमीतकमी ५ हजार रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर १ हजार रुपयांच्या पटीत रिचार्ज वाढविता येईल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबॅकिंगद्वारे रिचार्जची सोय उपलब्ध आहे. वॉलेट रिचार्ज केल्यानंतर वॉलेट अॅपद्वारे महावितरणच्या वीजग्राहकांकडून वीजबिलांची वसुली करता येईल. वीजबिलांचा भरणा केल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या संबंधीत मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठविला जाईल. विशेष म्हणजे एका वॉलेटमधील शिल्लक रक्कम वापरून सबवॉलेटद्वारे एकापेक्षा अधिक व्यक्ती ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करू शकणार आहेत. .............महावितरण वॉलेटमधून ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करून कमिशनच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.शहरी व ग्रामीण भागातील इच्छुकांनी त्वरित महावितरणच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन अर्जाद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.