पुणे : शहरातील सहा मीटर रुंदीचे सर्व रस्ते नऊ मीटर करण्याचा प्रशासनाने ठेवलेला प्रस्ताव स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचा विरोध डावलत भाजपाने हा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर केला. प्रशासनाने ठेवलेल्या ३२३ रस्त्यांच्या प्रस्तावाला उपसूचना देत सर्वच रस्ते नऊ मीटर करण्यासाठी हरकती-सूचना मागविण्यास मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.शहरात नऊ मीटर रुंदीपेक्षा कमी रुंदीचे दोन हजार रस्ते आहेत. या रस्त्यांची लांंबी ८०० किलोमीटर आहे. पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्थायी समितीपुढे शहरातील १०३ किलोमीटर अंतराचे सहा मीटर रुंदीचे ३२३ रस्ते नऊ मीटर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. स्थायीला हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेसह मनसेने सत्ताधारी भाजपाने ठराविक बांधकाम व्यावसायिकांसाठी हा घाट घातल्याचा आरोप केला होता. रस्तेच रुंद करायचे असतील, तर संपूर्ण रस्त्यांचे रुंदीकरण झाल्याशिवाय 'टीडीआर' वापरता येणार नाही, अशी अट टाकण्याची मागणी केली होती. विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन माहिती दिली होती. त्यावेळी पवार यांनी, बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करू नये; अन्यथा राज्य सरकारला आपले अधिकार वापरावे लागतील, असे स्पष्ट केले होते. दरम्यान, पवार यांच्या वक्तव्याला भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दादा, तुमची दादागिरी चालणार नाही असे म्हणत उत्तर दिले होते.हा प्रस्ताव मागील आठवड्यातच स्थायीसमोर आला होता. एक आठवडा पुढे ढकलण्यात आलेल्या या प्रस्तावावर मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली. शहरातील सर्व रस्त्यांपैकी दाखल प्रस्तावमधील रस्त्यांव्यतिरिक्त पुणे पालिका हददीतील सार्वजनिक वहिवाटीचे, मंजुर प्लॉटेड ले -आउटमधील, मंजुर गुंठेवारी विकासामधील, मंजुर टिपी स्किमधील सहा मीटर किंवा त्यापुढील रुंदीचे रस्ते नऊ मीटर रुंद करण्यासाठी हरकती आणि सुचना मागविण्यास मान्याता देण्याची उपसुचना राजेंद्र शिळीमकर, दिपक पोटे, सुनिल कांबळे, वर्षा तापकीर यांनी दिली. या उपसुचनेला शिवसेना, कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोध केल्यावर मतदान घेण्यात आले. भाजपाने बहुमताच्या जोरावर दहा विरुध्द नऊ मतांनी हा प्रस्ताव मंजुर केला.=====शहरातील सहा मीटरच्या रस्त्यावर टीडीआर वापरण्यास मनाई होती. त्यामुळे या रस्त्यांवरील बांधकाम पुनर्विकास रखडला होता. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम २१० (१) (ब) नुसार सहा मीटरचे रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुर्नविकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. टीडीआर वापरात आल्यास पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल. परिणामी विकासाला हातभार लागेल.- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती
राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा विरोध झुगारत सत्ताधारी भाजपकडून रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 8:46 PM
पालकमंत्री अजित पवार यांनी रस्ते रुंदीकरणाच्या मुद्द्याच्या संदर्भात बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करू नये; अन्यथा राज्य सरकारला आपले अधिकार वापरावे लागतील, असे स्पष्ट केले होते...
ठळक मुद्देशहरातील १०३ किलोमीटर अंतराचे सहा मीटर रुंदीचे ३२३ रस्ते होणार नऊ मीटर ठराविक बिल्डर आणि भ्रष्टाचार डोळ्यासमोर ठेवल्याचा विरोधकांचा आरोप