इंदापूर/ बावडा : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व स्वत: मी बावडा गावच्या ग्रामीण रुग्णालयासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पासाठी फंड मिळवला. परंतु जनतेची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांनी नारळ फोडून उद्घाटन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. मात्र सीएसआर फंडाचा आणि तुमचा काय संबंध, उगीच कशाला नारळ फोडता, जर तुम्हाला नारळ फोडायचे असतील तर नारळ उपलब्ध करून देतो असा घणाघात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला.
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय बावडा येथील सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शनिवार (दि.२८) रोजी करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री भरणे बोलत होते. इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय वैद्य, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. सुहास शेळके, सुरेश शिंदे, हनुमंत कोकाटे, उमेश घोगरे, सचिन सपकळ, विजय घोगरे, अभिजित घोगरे, बाळासाहेब कोकाटे, तुकाराम घोगरे, शीतल कांबळे, अजित टिळेकर, पांडुरंग कांबळे, जालिंदर गायकवाड, नागेश गायकवाड यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, विरोधक किती दिवस किती वर्ष खोटे बोलणार आहेत. इंदापूर तालुक्यातील जनतेने घरी आराम करण्यासाठी आपणास राजकारणातून घरी बसवले आहे. तरीदेखील दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडत आहे हे बरोबर नाही. आत्ता आम्ही केलेले कामे आपला कोणताही अधिकार नसताना, थेट नारळ फोडण्याचे नाटक करता हे बरोबर नाही.
त्यांना हा निधी कुठून उपलब्ध केला? कधी केला? याचा मागमूसही नाही. मला जनतेच्या विकास कामात कधीच राजकारण करायचे नाही नाही. मात्र तालुक्यातील जनतेची जर कोणी अशा पद्धतीने चुकीची दिशाभूल करत असेल तर, तालुक्यातील जाणता अशा लबाड लोकांना जाब विचारेल. असाही इशारा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला. यावेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील हनुमंत कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रस्ताविक उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सुहास शेळके यांनी केले तर आभार उमेश घोगरे यांनी मानले.
थांबा, करतो, देतो असे कधीही राज्यमंत्री भरणे म्हणत नाहीत
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या समस्या माहिती आहेत. कोणालाही ते थांबा, करू, देऊ अशा भूलथापा देत नाहीत. थेट जेवढा निधी मागेल तेवढा निधी सामाजिक त्या कामासाठी देण्याचा मनापासून प्रयत्न करतात. आगामी येणाऱ्या निवडणुकीत बावडा परिसरातील मतदार विक्रमी मताधिक्य राज्यमंत्री भरणे यांच्या पाठीशी देईल, अशी ग्वाही माजी सभापती प्रशांतराव पाटील यांनी दिली.
अजित पवार बावडा ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन करतील
बावडा गावातील जे ग्रामीण रुग्णालय उभे राहिले आहे. या रुग्णालयाच्या जागेच्या प्रश्नापासून ते आजपर्यंत प्रयत्न केले आहेत. यासाठी निधीचे पाठबळ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोलाची मदत केली आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुढील काही दिवसात करतील, अशी घोषणा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
फोटो ओळ : इंदापूर तालुक्यातील बावडा येथे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मान्यवर.