धायरी : सिंहगड रोडवर बीआरटी सुरू करण्यास सिंहगड नागरी कृती समितीने विरोध केला आहे. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर बीआरटी सुरू करणे म्हणजे ‘रोगापेक्षा औषध जहाल’ अशी प्रतिक्रिया समितीने व्यक्त केली. त्यापेक्षा या मार्गाला पर्यायी मार्ग सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.प्रत्यक्षात प्लॅनमध्ये सिंहगड रस्ता (तानाजी मालुसरे रस्ता) हा १२० फुटांचा आहे; परंतु प्रत्यक्षात तो दांडेकर पुलापासून ते वडगाव खुर्दपर्यंत ८० ते ९० फूटच ताब्यात आहे. त्यामुळे सदरचा रस्ता अरुंद आहे.सिंहगड रस्त्याला कुठेही पर्यायी रस्ता नाही. नुकताच नदीपात्रातील रस्त्यालाही उच्च न्यायालयाने मनाईचा आदेश दिला आहे.सिंहगड रस्ता हा एक मार्ग असल्यामुळे नवीन वसाहती, गृहनिर्माण संस्था, गावामध्ये होणारे असंख्य फ्लॅट्स, सिंहगडावर व खडकवासल्याकडे जाणारे पर्यटक, हायवेला जाणारी वाहने मोठ्या प्रमाणावर आहेत. तरी प्रत्यक्षात बीआरटी करण्यासाठी पर्यायी मार्ग खडकवासल्यापासून स्वारगेटपर्यंत करणे गरजेचे आहे.सार्वजनिक पीएमपी व्यवस्थेची अवस्था पाहून हा प्रयोग करणे म्हणजे जीवितहानीस एक आमंत्रण ठरेल. बीआरटीसाठी दांडेकर पुलापासून खडकवासल्यापर्यंत वेगवेगळ्या चौकांत फ्लायओव्हर ब्रिज (उड्डाणपूल) बांधावे लागतील. पथारी व्यावसायिक, भाजीविक्रेते रस्त्यावरच व्यवसाय करतात. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर बीआरटी करू नये. रस्ता रुंद करावा, असे निवेदन कृती समितीचे अध्यक्ष हरिदास चरवड यांनी महापौर, आयुक्त व पीएमपीला दिले आहे.(वार्ताहर)
सिंहगड रस्त्यावरील बीआरटीला विरोध
By admin | Published: October 07, 2016 3:12 AM