बारामती : बारामती नगरपालिकेच्या कारभाराची यापूर्वी दोन वेळा चौकशी झाली आहे. त्यामध्ये बरेच गंभीर आक्षेप घेण्यात आलेले आहेत, असे असताना सन २०१३/ २०१४ च्या लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप लेखापरीक्षकांनी घेतले आहेत. एक हाती सत्ता असताना बारामती पालिकेच्या कारभारावर सातत्याने आक्षेप घेतले जातात. आक्षेपाच्या अनुपालनावर काय भूमिका घेतली जाते, याबाबतदेखील संभ्रम आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या कामांबाबत पालिकेकडून कागदोपत्री पुरावे सादर केलेले नसल्याचे लेखापरीक्षणात पुन्हा एकदा उघड झाले आहे.नगरपालिकेच्या सन २०१३/१४ चा लेखापरीक्षण अहवाल नुकताच सादर झाला आहे. तत्कालीन नगराध्यक्षा जयश्री सातव, तत्कालीन मुख्याधिकारी रवी पवार यांच्या काळातील या आर्थिक वर्षात अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. राज्य शासनाने अद्यादेशाद्वारे दुहेरी लेखी नोंद पद्धतीची अंमलबजावणी करावी, असे सूचित केलेले असतानादेखील त्याची कार्यवाही केलेली नाही. यापूर्वीच्या लेखापरीक्षणात आक्षेप घेऊनदेखील त्याची पूर्तता या वर्षातदेखील केलेली नाही. मालमत्ता कराची आकारणी भांडवली मूल्यावर करण्याची आवश्यकता होती. पालिकेकडे जागेची व बांधकामाची किंमत उपलब्ध असतानादेखील त्याच्याप्रमाणे कार्यवाही केलेली नाही. (प्रतिनिधी)भूमिगत वीजवाहिन्या... : साठवण तलावाच्या कामात अनियमितता...७ कोटी ९० लाख रुपयांचे काम होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. या कामाचे पूर्ण ठेव तत्त्वावर देण्याबाबत व रक्कम समायोजनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेण्यात आली नाही. कामाची रक्कम टप्प्याटप्प्याने देणे आवश्यक असताना एकर रकमी देण्यात आली. त्यामुळे नगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. १८.८१ टक्के कमी दराच्या ठेकेदार संदीपा पॉवर लाईन्सने निविदेनुसार कामाची किंमत ६ कोटी ४२ लाख ५ हजार इतकी होत आहे. १ कोटी ४७ लाख ९५ हजार उर्वरित रक्कम नगरपालिकेकडे परत जमा केले नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. पालिकेच्या या वर्षातील अनेक विकासकामांत अनियमितता असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या निर्णयानुसार उपलब्ध झालेली रक्कम थेट नगरपालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या खात्यावर जमा केली. त्याचे प्रमाणपत्र जोडलेले नाही. १२८ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधला आहे. त्याच्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. भिंतीला तडे गेले आहेत. साठवण तलावाच्या तळातूनदेखील पाण्याची गळती होत आहे, असे असताना कामाच्या दर्जाबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. जीवन प्राधिकरणाच्या गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी होत असल्याचे तोंडी सांगून कागदोपत्री पुरावे सादर केलेले नाहीत. या कामात ठेकेदाराला देण्यात आलेली जादा रक्कम, काम मंजूर केलेली दरसूची, आदींबाबत तपशीलदेखील पालिकेने सादर केलेला नाही.
बारामतीतील विकासकामांवर आक्षेप
By admin | Published: May 01, 2016 2:53 AM