पुणे - उत्तर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना थांबविण्यासाठी सर्वपक्षीय विरोधक एकवटल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी चाकण येथे झालेल्या बैठकीत विरोधकांनी खेड-आळंदी विधानसभा मतदार संघासाठी नवा पर्याय देणार असल्याचा निश्चय केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर पुण्यामध्ये मोठी खलबते सुरू झाली आहेत. खेड, आंबेगाव आणि जुन्नरला अजित पवार गटाचे आमदार आहे. त्यामुळे शरद पवारांनी या मतदारसंघावर विशेष लक्ष दिले असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. खेड तालुक्यामध्ये आमदार दिलीप मोहिते-पाटील यांची अपवाद वगळता एक हाती सत्ता आहे. तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढली असून, वादविवादाचे प्रकारही वाढू लागले आहे. या प्रकारामुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडीतीलच नाही तर अन्य पक्षातील नेतेमंडळी एकवटली आहे. शुक्रवारी चाकण येथे या सर्वपक्षीय नेतेमंडळींची बैठक झाली. त्यामुळे खेड-आळंदी मतदारसंघात नवा पर्याय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बैठकीसाठी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हाध्यक्ष समीरभाऊ थिगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलबाबा राक्षे, युवा नेते सुधीर मुंगसे, माजी सभापती रामदास ठाकूर, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, निवडणूक समन्वयक माजी उपसभापती अमोलदादा पवार, शिंदेसेनेचे संघटक अक्षय जाधव, तालुकाप्रमुख राजूशेठ जवळेकर, प्रदूषण महामंडळाचे संचालक नितीन गोरे, सुनील धंद्रे, युवा नेते संजय घनवट, बाजार समितीचे संचालक अनुराग जैद, सागर मुऱ्हे , विशाल पोतले यांसह विविध पक्षांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खेड तालुक्यात शांतता प्रस्थापित व्हावी, चांगले वातावरण राहावे, तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा, भीतीचे वातावरण नष्ट व्हावे, यासाठी समाज मान्यता असलेला आणि चांगली वर्तणूक असलेला उमेदवार तालुक्याचा आमदार व्हावा, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचे बैठकीतील एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.
ही अतिशय महत्त्वाची घटना असून, आतापर्यंत खेड तालुक्यामध्ये अशा प्रकारे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अनेक निर्णय केले आहेत. नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता देखील त्याच माध्यमातून परिवर्तन झाली आहे. या प्रमुख नेत्यांना एकत्रित आणत असताना या पाठीमागे तालुक्यातल्या अनेक ज्येष्ठ मंडळींचा देखील हातभार असेल, असे बोलले जात आहे.
वळसे-पाटील, बेनकेंची धाकधूक वाढलीएकीकडे देवदत्त निकम, तर दुसरीकडे रमेश येवले दोघेही महाविकास आघाडीचे आहेत, त्यामुळे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची धाकधूक वाढू लागली आहे. निकम यांना वळसे-पाटील यांच्या गावातूनच सहानुभूती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांना मिळालेली सहानुभूती सर्वांनी अनुभवली आहे. विधानसभा निवडणुकीतही तशीच अवस्था असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे-पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. तिकडे अतुल बेनके यांनीही शरद पवार गटात जाण्यासाठी कंबर कसली होती. भाऊ अमोल बेनके त्यांनतर कुटुंबातील अन्य सदस्यांनीही शरद पवारांना भेटून अतुल बेनके यांना पक्षात घेण्याची विनंती केली होती. मात्र, तसे काही झाले नाही. शरद पवारांच्या लाटेमुळे वळसे-पाटील, अतुल बेनके अस्वस्थ असल्याची चर्चा उत्तर पुण्यात सुरू झाली आहे.