नारायणगाव : जुन्नर तालुक्यात मोठी समजली जाणाऱ्या एका ग्रामपंचायतीमध्ये दोन ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये जोरात हाणामारी झाल्याने याबाबत आज दिवसभर चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे ही हाणामारी लेखापरीक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर झाल्याने चर्चेला अजून उधाण आले. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. ही बाब सामंजसपणे मिटविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक प्रयत्न करीत आहेत. जुन्नर तालुक्यात अग्रगण्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सालाबादप्रमाणे लेखापरीक्षण सुरू आहे. हे लेखापरीक्षण अधिकारी करत असताना ग्रामपंचायतमध्ये तत्कालिन ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये आला व त्याने सध्या कार्यरत असलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याला पूर्वी झालेल्या कामांच्या एमबीबाबत वाद सुरू केला. हा वाद विकोपाला गेला व तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्याने सध्या कार्यरत असलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी उपस्थित असलेले ग्रामपंचायत कर्मचारी व लेखापरीक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी दोघांना बाजूला करून वाद-विवाद थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमध्ये शिवीगाळ व खडाजंगी सुरूच होती. या ग्रामपंचायतीच्या तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कारकिर्दीमध्ये काही विकासकामे झाली. त्या विकासकामांची एमबी केली नसताना रक्कम अदा करण्यात आल्याने विद्यमान ग्रामविकास अधिकाऱ्याने याबाबत तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्यास जाब विचारला, कोणतेही रेकॉर्ड सापडत नसल्याने सध्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने माहिती मागितली. त्या दोघांमध्ये कालदेखील वाद झाला होता. (वार्ताहर)या वादातून तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्याने सध्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्याची माफी मागून विषय संपविला होता. त्यानंतर आज दोघांमध्ये त्याच विषयावर वाद होऊन हाणामारीपर्यंत प्रकरण गेल्याने कामाच्या एमबीमध्ये काहीतरी दडलं असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. मारहाणीनंतर विद्यमान ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सोडून घरी निघून गेला. दिवसभर त्यांचे सेलफोन बंद होते. त्यामुळे त्यांचेकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. या ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी नुकतीच झालेली आहे. या ग्रामपंचायतीच्या पाच ग्रामविकास अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपकादेखील ठेवण्यात आलेला आहे. यापूर्वी सन २०१३ मध्ये झालेल्या दप्तर तपासणीमध्ये या दोन्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांवर गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणातूनच ही मारमारी झाल्याची गरमा गरम चर्चा परिसरात सुरू आहे. या ग्रामपंचायतीच्या गावातील यात्रा दोन-तीन दिवसांवर येवून ठेपली असतानाच या मारहाणीमुळे ही ग्रामपंचायत चर्चेत आलेली आहे. हे दोन्ही ग्रामविकास अधिकारी मारहाणीच्या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करणार किंवा संघटनेच्या माध्यमातून झालेल्या हाणामारीवर पांघरून घालणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिकाऱ्यांसमोरच ग्रामसेवकांत हाणामारी
By admin | Published: May 01, 2016 2:50 AM