पुणे : नगररोड परिसरातील सर्वच भागातील पाणी पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय लष्कर, वारजे जलकेंद्रासोबतच महाराष्ट्र जीवन प्राधीकरणातून होणारा पाणी पुरवठा बंद करून अन्यत्र वळवू नये़ तसेच भामा आसखेडचे पाणी अन्य भागात नेऊन, पुन्हा नगररस्ता परिसराला पाणी टंचाईच्या खाईत लोटू नये़ तसे केल्यास त्याला आमचा विरोध राहिल असे पत्र धानोरी येथील नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
नगररोड परिसराला सध्या दररोज १९० एमएलडी पाणी पुरवठा होत असतानाही दिवसांतून एकचवेळ आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. नव्याने सुरू होत असलेल्या भामा आसखेड प्रकल्पातूनही साधारण २०० एमएलडी पाणी दररोज मिळणार आहे. यानुसार नगररोड परिसरातील धानोरी, कळस, टिंगरेनगर, येरवडा, विमाननगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी आखण्यात आलेल्या भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्याभरात या योजनेचे उदघाटन होउन प्रत्यक्ष पाणी पुरवठाही सुरु होईल़ परंतु, प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वीच आत्तापासूनच वानवडी, हडपसर परिसरातील नगरसेवकांकडून भामा आसखेडचे पाणी त्यांच्या भागाला मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक अनिल टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन भामा आसखेडचे पाणी अन्य भागास देण्यास थेट विरोध दर्शविला आहे. तसे केल्यास वेळप्रसंगी व्यापक जनआांदोलनही उभारू़ असा इशाराही टिंगरे यांनी या पत्राव्दारे दिला आहे़
-----------------------